Babri Masjid Case: सगळेच निर्दोष असतील, तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का?; ओवेसींचा सवाल
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 03:12 PM2020-09-30T15:12:47+5:302020-09-30T15:15:49+5:30
Babri Masjid Case: सीबीआयच्या निकालावर असदुद्दीन ओवेसींकडून अनेक प्रश्न उपस्थित
नवी दिल्ली: बाबरी मशीद प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष आहेत. मग बाबरी मशीद कोणी तोडली. ती जादूनं पडली का?, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर विश्वास असणाऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश आज देण्यात आला, अशा शब्दांत ओवेसींनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं बाबरी मशीद प्रकरणातील ३२ आरोपींची आज सुटका केली. ही घटना पूर्वनियोजित नव्हती. तर ती अचानक घडल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. न्यायालयाच्या निकालावर ओवेसींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. 'कोणीच दोषी नसेल तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का? मशिदीत जादूनं मूर्ती ठेवण्यात आल्या का? मशिदीचं कुलूप जादूनं उघडण्यात आलं का?,' असे सवाल त्यांनी विचारले.
Decision by CBI court is a black day for Indian judiciary because the SC already said in civil property dispute of the site as 'an egregious violation of rule of law' & 'calculated act of destroying a public place of worship': A Owaisi, AIMIM, on the #BabriMasjidDemolitionVerdicthttps://t.co/vtj53XHQEV
— ANI (@ANI) September 30, 2020
हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश देणारा निकाल सीबीआयच्या न्यायालयानं दिल्याचं ओवेसी म्हणाले. 'लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी हिंसाचार झाला. जाळपोळ झाली. घरं पेटवून देण्यात आली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक धक्का ओर दौ, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या होत्या. मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय लाभासाठी मशीद पाडली. पुढे यातूनच त्यांना सत्ता मिळाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,' असं ओवेसी म्हणाले.
बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी चिथावणी दिली होती आणि हे संपूर्ण जगानं पाहिलं, अशा शब्दांत ओवेसींनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं. 'बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचला गेला. मशीद पाडली जाईपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नका, असं आडवाणींनी कल्याणसिंह यांना सांगितलं होतं. पुढे हेच कल्याणसिंह राज्यपाल झाले. आडवाणी उपपंतप्रधान झाले. उमा भारती केंद्रात मंत्री झाल्या. बाबरी पाडून त्यावरच या सगळ्या नेत्यांची त्यांची कारकीर्द उभी राहिली,' असं ओवेसी म्हणाले.