Babri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 01:59 PM2020-09-30T13:59:08+5:302020-09-30T14:00:19+5:30
Babri Masjid Case: लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींसह ३२ जणांची सुटका
लखनऊ: बाबरी मशीद प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची सुटका केली आहे. वादग्रस्त ढाचा पाडल्याची घटना पूर्वनियोजित नव्हती. ती अचानक घडली, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. सीबीआयकडून करण्यात आलेले अनेक युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावले आणि २८ वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद खटल्यात निकाल दिला.
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह एकूण ३२ जण या खटल्यात आरोपी होते. न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यावर आडवाणींनी आनंद व्यक्त केला. 'सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेल्या निकालाचं मी मनापासून स्वागत करतो. राम मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात मी आणि भाजपनं स्वत:ला झोकून दिलं होतं. हा निर्णय राम मंदिराबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करणारा आहे,' असं आडवाणी म्हणाले.
I wholeheartedly welcome the judgement by the Special Court in #BabriMasjidDemolitionCase. The judgement vindicates my personal and BJP's belief and commitment toward the Ram Janmabhoomi movement: Lal Krishna Advani after being acquitted by Special CBI Court, Lucknow pic.twitter.com/7E95Q1vCNp
— ANI (@ANI) September 30, 2020
'सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबर २०१९ मध्ये राम मंदिराबद्दलचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे भव्य राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. आता बाबरी मशीद प्रकरणाचाही निकाल आला आहे. या सगळ्या पाठोपाठ घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहून आनंद वाटतो,' अशी भावना आडवाणींनी व्यक्त केली.
'फोटोतून कोणी दोषी ठरत नाही'
फोटोतून कोणी दोषी ठरत नसल्याचं न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना म्हटल्याची माहिती निकालानंतर न्यायालयातून बाहेर आलेल्या वकिलांनी दिली. 'वादग्रस्त ढाता पाडण्याचा कोणताही प्रयत्न आरोपींनी केला नाही. त्या दिवशी घडलेली घटना पूर्वनियोजित असती, तर तिथल्या रामललाच्या मूर्ती आधीच हटवल्या गेल्या असत्या,' असं न्यायालयानं म्हटलं.
न्यायालय म्हणतं, घटना अचानक घडली
ही घटना पूर्वनियोजित नव्हती. ती अचानक घडली, असं न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. न्यायालयासमोर ठेवण्यात आलेले पुरावे सर्व आरोपींची सुटका करण्यासाठी पुरेसे आहेत, असं न्यायमूर्ती म्हणाले. यावेळी न्यायालयाकडून सादर करण्यात आलेले पुराव्यांवरही प्रश्न उपस्थित केले.