Babri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट
By पूनम अपराज | Published: September 30, 2020 01:37 PM2020-09-30T13:37:29+5:302020-09-30T13:40:30+5:30
Babri Masjid Veridct : सर्व आरोपींनी बाबरी मशीद वाचवण्याचा प्रयत्न केला. अचानक गर्दी तिथे आली आणि जमावाने बाबरी पतन केली. ज्यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट केली गेली होती, त्या 32 लोकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देण्यात आला आहे. २८ वर्षांनंतर या वादग्रस्त विषयावर न्यायालयाने निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, काहीही छायाचित्रांद्वारे सिद्ध होत नाही. या प्रकरणात पुरावांमध्ये छेडछाड केली गेली, फोटो, व्हिडिओ, फोटोकॉपी ज्या पद्धतीने सिद्ध केल्या गेल्या, त्या पुराव्यात ते मान्य नाही. 2300 पानांच्या निर्णयामध्ये विशेष न्यायाधीश एस.के. यादव म्हणाले की, केवळ छायाचित्रांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवले जाऊ शकत नाही. सर्व आरोपींनी बाबरी मशीद वाचवण्याचा प्रयत्न केला. अचानक गर्दी तिथे आली आणि जमावाने बाबरी पतन केली. ज्यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट केली गेली होती, त्या 32 लोकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
विशेष न्यायाधीश एस के यादव म्हणाले की, ही घटना पूर्व नियोजित नव्हती, संघटनेने बर्याच वेळा थांबण्याचा प्रयत्न केला. ही घटना अचानक घडली आणि जमावाने बाबरी पतन केली. विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख असलेले अशोक सिंघल यांच्याविरूद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाने एकूण 32 आरोपींवर आज निकाल दिला. यावेळी आरोपींपैकी साध्वी ऋतुंभरा, विनय कटियार, चंपतराय, साक्षी महाराज आणि जय भगवान गोयल हे न्यायालयात उपस्थित होते. तर आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी न्यायालयात उपस्थित नव्हते. या प्रकरणावर निकाल देताना न्यायमूर्ती एस.के. यादव यांनी सांगितले की, बाबरी मशीद ही नियोजबद्धरीतीने पाडण्यात आलेली नाही. नेत्यांनी करसेवकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींच्या विरोधात फोटो, व्हिडीओ आणि फोटोकॉपीच्या माध्यमातून पुरावे देण्यात आले. मात्र त्यामधून काहीही सिद्ध होत नाही. तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्याविरोधात काहीही पुरावे मिळालेले नाहीत, असे सांगत न्यायमूर्तींनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
All accused in Babri Masjid demolition case acquitted by Special CBI Court in Lucknow, Uttar Pradesh. pic.twitter.com/9jbFZAVstH
— ANI (@ANI) September 30, 2020
बाबरी मशीद पतन प्रकरणाबाबत माहिती
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले.