मोदींनी ७ दिवसांपूर्वी नारळ दिला अन् 'तो' थेट विरोधी पक्षालाच 'फॉलो' करू लागला; भाजपला धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:53 PM2021-07-13T21:53:46+5:302021-07-13T21:55:49+5:30
भाजप खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा; मंत्रिपद गेल्यानं नाराजी
कोलकाता: गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तब्बल ४३ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी मोदी सरकारमधील १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले. यामध्ये अनेक वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांनादेखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सुप्रियो यांनी नाराजीदेखील व्यक्त केली.
बाबुल सुप्रियो राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशादेखील चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यांनी ट्विटरवर तृणमूलचे नेते मुकूल रॉय आणि तृणमूलच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिपदाचा राजीमाना दिल्यानंतर सुप्रियो यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यामधून त्यांनी स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.
मला ज्याप्रकारे मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं, ते ठीक नव्हतं. मला राजीनामा देण्यास सांगितलं गेलं. त्यामुळे मी राजीनामा देऊन टाकला, असं सुप्रियो यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. सुप्रियो यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर तृणमूलच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी टोला लगावला होता. सुप्रियो आणि बॅनर्जींचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपासून अनेकदा सुप्रियो आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं आहे.
लोकसभेचे खासदार असलेल्या बाबुल सुप्रियो यांना भाजपनं टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. मात्र ते पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीच्या आधी तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तृणमूलनं २०० हून अधिक जागा जिंकत सत्ता राखल्यानंतर भाजपला ओहोटी लागली. अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला. केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यानं राज्यातले भाजपचे अनेक खासदार नाराज आहेत.