"मुख्यमंत्री पहिल्यांदाच गायब", हेमंत सोरेन यांचा शोध घेणाऱ्याला भाजप नेत्यांकडून 11 हजारांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:54 PM2024-01-30T12:54:02+5:302024-01-30T13:10:08+5:30

ही घोषणा अन्य कोणी नसून झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

babulal marandi on missing cm hemant soren letter ed delhi residence ranchi land scam case, jharkhand  | "मुख्यमंत्री पहिल्यांदाच गायब", हेमंत सोरेन यांचा शोध घेणाऱ्याला भाजप नेत्यांकडून 11 हजारांचे बक्षीस 

"मुख्यमंत्री पहिल्यांदाच गायब", हेमंत सोरेन यांचा शोध घेणाऱ्याला भाजप नेत्यांकडून 11 हजारांचे बक्षीस 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या गायब झाले आहेत, ते कुठे आहेत? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) टीमसोबत येथील लोकही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वाट पाहत आहेत. त्यांचा शोध घेणाऱ्या व्यक्तीसाठी भरघोस बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. ही घोषणा अन्य कोणी नसून झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी झारखंडच्या जनतेला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करत टोला लगावला आहे. पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे केंद्रीय एजन्सीच्या भीतीने बेपत्ता झाल्याचे लिहिले आहे. तसेच, गेल्या चाळीस तासांपासून त्यांचा पत्ता नाही. मुख्यमंत्री आपले सार्वजनिक कर्तव्य सोडून बेपत्ता आहेत आणि तोंड लपवून पळत आहेत, असे म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे, केवळ त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेलाच धोका नाही तर संपूर्ण झारखंडच्या लोकांच्या सुरक्षेला आणि सन्मानालाही धोका आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांचा शोध घेणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणाही मरांडी यांनी केली आहे. जो कोणीही विलंब न लावता झारखंडच्या आश्वासक मुख्यमंत्र्यांचा शोध घेईल, त्यांना शोधून सुखरूप परत आणेल, त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे बाबूलाल मरांडी यांनी म्हटले आहे.

बाबूलाल मरांडी यांचे मार्मिक आवाहन
आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी झारखंडच्या जनतेला एक मार्मिक आवाहन लिहिले आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गायब असल्याचे लिहिले आहे. 

हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त
दरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. सोमवारी ईडीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. हेमंत सोरेन हे शनिवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. चार्टर्ड विमानाने ते पहाटे दिल्लीला पोहोचले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तपास यंत्रणा चौकशीसाठी त्यांचा शोध घेत आहे. मात्र त्यांचे ठिकाण अद्याप कळू शकलेले नाही. 
 

Web Title: babulal marandi on missing cm hemant soren letter ed delhi residence ranchi land scam case, jharkhand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.