जेट एअरवेजमध्ये जन्मलं बाळ, आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची सवलत
By admin | Published: June 19, 2017 11:42 AM2017-06-19T11:42:53+5:302017-06-19T11:52:24+5:30
जेट एअरवेजच्या विमानात जन्म झालेल्या बाळाला आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची सवलत देण्यात येत असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - जेट एअरवेजच्या विमानात जन्म झालेल्या बाळाला आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची सवलत देण्यात येत असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. सौदी अरबस्तानातील दम्माम येथून कोचीकडे येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका महिला प्रवाशाची सुखरूप प्रसूती होऊन एक मुलगा जन्माला आला. आई आणि मूल दोघेही सुखरुप आहेत.
जेट एअरवेजचं 9W 569 विमान 2 वाजून 55 मिनिटांनी दम्माम येथून कोचीकडे रवाना झालं होतं. यावेळी विमानात उपस्थित महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. यानंतर वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. नियमानुसार शेजारच्या म्हणजे मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यात आलं.
विमानात एकूण 162 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी केबिन क्रू ने विमानात कोणी डॉक्टर असल्यास मदतीकरता पुढे येण्याची विनंती केली. प्रवाशांमध्ये कोणीही डॉक्टर नव्हता, मात्र सुटीत केरळला घरी परत निघालेली एक परिचारिका होती. तिच्या मदतीने विमान कर्मचाऱ्यांनी या महिलेची प्रसूती सुखरूपपणे पार पाडली.
मुंबईत विमानाचं लँडिंग झाल्यानंतर महिला आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांचीही तब्बेत व्यवस्थित असून सुखरुप असल्याची माहिती जेट एअरवेजने दिली आहे.
"आमच्या विमानात जन्माला आलेलं हे पहिलंच बाळ असल्याने, जेट एअरवेजला त्याला आयुष्यभर मोफत प्रवासाचा पास देताना आनंद होत असल्याचं", कंपनीने म्हटलं आहे. महिला आणि बाळाला सुखरुप सोडल्यानंतर विमान कोचीला रवाना झालं. वैद्यकीय आणीबाणीमुळे विमानाला 90 मिनिटं उशीर झाला आणि 12.45 वाजता विमान पोहोचलं.