...तर राहुल गांधींचं जन्मलेलं बाळही काँग्रेस अध्यक्ष होईल- अमित शाह
By admin | Published: January 30, 2017 01:55 PM2017-01-30T13:55:57+5:302017-01-30T14:07:21+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. जर राहुल गांधींनी लग्नाचा विचार केल्यास त्यांचं येणारं बाळही आगामी काळात विरोधी पक्षाचा नेता होईल, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीवर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. लखनऊमध्ये उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अमित शाह शनिवारी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींचं कुटुंब हे घराणेशाहीचं उत्तम उदाहरण आहे. नेहरुंनंतर इंदिरा गांधी राजकारणात आल्या आणि त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. आता राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होऊ पाहत आहेत, माझा या घराणेशाहीला तीव्र विरोध आहे, असंही अमित शाह म्हणाले आहेत. आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देणे ही घराणेशाही नसल्याचंही त्यांनी प्रतिपादन केलं आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीमुळे भाजपाला उत्तर प्रदेशात काहीच फरक पडणार नाही. फक्त समाजवादी पार्टीमुळे भाजपावर थोड्या फार प्रमाणात परिणाम होऊ शकतो. अखिलेश उत्तर प्रदेश राज्याला लुटत आहेत, तर राहुल गांधी देशाला लुटत आहेत, असं म्हणत त्यांनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीवरही टीका केली आहे.