बाळाचे दात पाळण्यात ! सात दातांसहित जन्मलं बाळ, जगातील कदातिच पहिलंच
By शिवराज यादव | Published: September 1, 2017 07:25 PM2017-09-01T19:25:02+5:302017-09-01T19:28:47+5:30
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, पण इथे चक्क बाळाचे दात पाळण्यात दिसत होते
अहमदाबाद, दि. 1 - अहमदाबादमध्ये सात दातांसहित एका बाळाचा जन्म झाल्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले आहेत. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, पण इथे चक्क बाळाचे दात पाळण्यात दिसत होते. बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टरांसाठी ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नव्हती. सात दातांसहित जन्माला येणारं जगातील कदाचित हे पहिलं बाळ आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पण बाळाचे सर्व दात नाजूक असल्याने ते काढून टाकण्यात आले आहेत.
अहमदाबादमध्ये राहणा-या शर्मा कुटुंबात बाळ जन्माला आल्याची बातमी मिळताच आनंद साजरा होऊ लागला. पण नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सात दात असल्याचं कळताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बाळाच्या आईला स्तनपान करताना त्रास होत होता. यानंतर शर्मा कुटुंबियांनी बालरोगतज्ञ डॉ निरव बेनानी आणि दंत चिकित्सक डॉ मीत रामात्री यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही डॉक्टरांनी दात काढून टाकण्याचा सल्ला दिला.
पालकांनी दात काढून टाकण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर बाळावर दोन सर्जरी करुन दात काढण्यात आले. जेव्हा बाळावर सर्जरी करुन दात काढण्यात आले तेव्हा ते फक्त एक महिन्याचं होतं. पहिल्या सर्जरीवेळी बाळाला अॅनेस्थेशिया देऊन तीन दात काढण्यात आले, आणि दुस-या सर्जरीवेळी बाकीचे चार दात काढून टाकण्यात आले.
'मी आतापर्यंत कधीच सात दातांसहित जन्माला येणारं बाळ पाहिलेलं नाही', असं डॉ निरव यांनी सांगितलं आहे. डॉ रामात्री बोलले आहेत की, 'बाळाला रेग्यूलर अॅनेस्थेशिया देणं अशक्य असल्याने आम्ही लोकल अॅनेस्थेशिया दिला होता. सर्जरी करणं सोपी गोष्ट नव्हती. आमच्यासमोर मोठं आव्हान होतं. बाळाचा दात काढण्यासाठी आम्हाला 15 मिनिटं लागली'.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळावर सर्जरी केली नसती तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होता. बाळाचा सर्व दात नाजूक असून ते हलत होते. यामुळे बाळाला जखम होण्याची शक्यता होती. तसंच दात अन्ननलिकेत अडण्याची शक्यताही नाकारता येत नाहीत. सर्जरी केल्यानंतर आता बाळाची तब्बेत चांगली आहे.