दीड वर्षाच्या बाळाने दिली मृत्यूला मात; वॉशिंग मशिनमुळे आला होता जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:38 PM2023-02-15T12:38:21+5:302023-02-15T12:38:37+5:30
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलेल्या मुलाला डॉक्टरांनी आवश्यक एंटीबायोटिक्स आणि आयव्ही फ्ल्यूइड सपोर्ट दिला होता.
नवी दिल्ली - 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यत दिल्लीतील एका भयंकर दुर्घटनेनंतर आला आहे. दीड वर्षाचा चिमुरडा साबण आणि पाण्याने भरलेल्या वॉशिंग मशिनमध्ये पडला. त्यात तो १५ मिनिटे बुडाला होता. त्यानंतर ७ दिवस कोमा, व्हेटिंलेटरवर आणि १२ दिवस वार्डात राहिल्यावर अखेर त्याने मृत्यूवर मात करत घरी बरा होऊन परतला. वसंत कुंजच्या हॉस्पिटलमध्ये मुलावर उपचार सुरू होते. आता या मुलाची तब्येत बरी असून त्याच्या जीवाला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
TOI नुसार डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा मुलाला हॉस्पिटलला आणलं तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत थंडगार पडला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्या ह्दयाचे ठोके कमी पडत होते. पल्स आणि बीपीही नव्हता असं त्यांनी म्हटलं. हा मुलगा टॉप लोडिंग वॉशिंग मशिनमध्ये १५ मिनिटे साबणाच्या पाण्यात बुडला होता. या मशिनचं झाकण उघडले होते. आई रुमच्या बाहेर गेली होती. जेव्हा ती परतली त्यानंतर तिला मुलगा सापडला नाही. वॉशिंग मशिनजवळ खुर्ची होती आईने डोकावून पाहिले तेव्हा मुलगा मशिनमध्ये पडल्याचं दिसून आले.
हा मुलगा जवळपास १५ मिनिटे मशिनमध्ये होता त्यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. परंतु दैवी चमत्कार की काय मुलाने मृत्यूवर मात करून पुन्हा घरी परतला आहे असं डॉक्टरांनी सांगितले. मुलाला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलला आणलं होते. साबणाच्या पाण्यामुळे त्याच्या शरीरावरील विविध भागांवर परिणाम झाला होता. केमिकल स्मोकमुळे श्वास घेण्यास अडथळा येत होता. त्याला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इंफेक्शनही झाले होते.
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलेल्या मुलाला डॉक्टरांनी आवश्यक एंटीबायोटिक्स आणि आयव्ही फ्ल्यूइड सपोर्ट दिला होता. त्यानंतर तो हळूहळू ठीक होऊ लागला. कोमातून बाहेर पडल्यानंतर मुलाने आईला ओळखलं. त्यानंतर मुलाचा व्हेंटिलेटर काढण्यात आला. ७ दिवसांपर्यंत तो आयसीयूत होता. त्यानंतर त्याला जनरल वार्डात शिफ्ट करण्यात आले. १२ दिवस डॉक्टरांनी मुलाला देखरेखीखाली ठेवले. मुलाचे सीटी ब्रेनही करण्यात आले. त्यात कुठलाही दोष आढळला नाही. त्यामुळे आता मुलाला घरी सोडण्यात आले असून पुढील रुटीन उपचारासाठी दवाखान्यात जावं लागणार आहे.