जिवंत चिमुरडीला डॉक्टरांनी 'मारलं'; व्हिडीओ शूटिंग सुरू होताच वेगळंच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:39 AM2021-05-24T11:39:39+5:302021-05-24T11:39:52+5:30
हात न लावताच डॉक्टरनं ४ वर्षांच्या मुलीला मृत घोषित केलं; उपस्थितांकडून संताप व्यक्त
उन्नाव: उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये डॉक्टरचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीला हात न लावताच, कोणतेही उपचार न करताच एका डॉक्टरनं मृत घोषित केलं. यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी आक्षेप नोंदवून विरोध सुरू करताच डॉक्टरनं उपचार सुरू केले. या प्रकरणी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुलीची प्रकृती गंभीर होती. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
लग्नात दारूवरून राडा; नवरदेव भडकला, पोलीस ठाण्यात पोहोचला अन् भलताच प्रकार घडला
रामापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला तिच्या ४ वर्षांच्या भाचीला घेऊन डॉक्टरांकडे गेली होती. डॉ. उमेश कुमार सिंह चिमुरडीला न तपासताच मृत घोषित केलं. डॉक्टरच्या या वर्तणुकीचा तिथे उपस्थित असलेल्यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी तिथे हजर असलेल्या काहींनी घटनेचा व्हिडीओ चित्रीत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सतर्क झालेल्या डॉ. उमेश कुमारनं मुलीवर उपचार सुरू केले. त्यानंतर चिमुरडीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.
या प्रकरणाची माहिती आपल्याला मिळाल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष कुमार यांनी सांगितलं. 'डॉ. उमेश कुमार यांचा गैरसमज झाला होता. मुलीनं डोळे फिरवले होते. तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र एखादा डॉक्टर रुग्णाची नाडी तपासल्याशिवाय मृत घोषित करू शकत नाही. प्रभारी अधिकाऱ्यांकडून याबद्दलची माहिती घेतली असून तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल,' असं आशुतोष कुमार यांनी सांगितलं.