बाळाला दोन हजारांत विकले
By Admin | Published: January 13, 2017 04:10 AM2017-01-13T04:10:34+5:302017-01-13T04:10:34+5:30
गरिबीने पिचलेल्या आणखी एका आदिवासी महिलेला आपले दोन दिवसांचे नवजात बाळ दुसऱ्या एका महिलेला
अम्बिकाप्रसाद कानुनगो / भुवनेश्वर
गरिबीने पिचलेल्या आणखी एका आदिवासी महिलेला आपले दोन दिवसांचे नवजात बाळ दुसऱ्या एका महिलेला दोन हजार रुपयांत विकावे लागल्याची घटना ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील काजला या आदिवासी पाड्यात घडली आहे.
गीता मुर्मू असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. सहा वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलाची आई असलेली गीता तिसऱ्यांदा गर्भवती असताना तिचा नवरा सोडून गेला. ‘नवऱ्याने दोन्ही मुले माझ्याजवळ सोडून माझा त्याग केला. आम्हाला धड दोनवेळचे जेवणही मिळत नाही. अशात तिसऱ्याला कसे पोसणार? तिसऱ्या मुलाचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला विकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता,’ असे गीता म्हणाली.
दरम्यान, नवजात बालकाला विकल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली आणि केंद्रपाडा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नवजात बालकाला विकणाऱ्या मातेला काय मदत केली व तिच्या पुनर्वसनासाठी काय-काय केले, याचा तपशीलही सादर करण्यात यावा, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
गीता मुर्मू आपल्या दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यासाठी रोजंदारीवर काम करते. सध्या ती आजारी असून केंद्रपाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. ‘दारिद्र्यामुळे दोन दिवसांच्या बाळाला मी ब्रह्मार्दिया पटाना येथील ममता साहू या महिलेला विकले. आधीच मी माझ्या दोन मुलांना पोटभर जेवण देऊ शकत नाही. अशातच हा तिसरा आला. याचा सांभाळ करणे कठीण असल्यानेच त्याला विकण्याचे ठरविले. ममतालाही मुलाची गरज होती म्हणून बाळ तिलाच विकण्याचा निर्णय घेतला. ममताने बाळाच्या बदल्यात मला दोन हजार रुपये देऊ केले आहेत,’ असे गीताने सांगितले.
‘आम्हाला दोनवेळचे जेवणही मिळत नाही. आम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशन कार्डपासूनही वंचित ठेवण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या योजनेत माझे नावच नोंदविलेले नाही,’ असे गीता म्हणाली.
भीषण गरिबीमुळे उचलले पाऊल
गीताकडून बाळ विकत घेण्यामागचे कारण ममता साहूने सांगितले. ती म्हणाली,‘मला मुलगा हवा होता. गीता दोन मुलांचे पोट भरू शकत नाही, हे मी पाहिले. अशातच तिसरा मुलगा पोटात असल्याचे पाहून मी तिला समजावले आणि हा तिसरा मुलगा मला देण्यास तयार केले. तिच्या तिसऱ्या बाळंतपणावर मी ६०० रुपयेही खर्च केलेले आहेत. मी तिला मुलांसह माझ्या घरी आणले आणि दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. बाळंतपणानंतर ती महिनाभर माझ्या घरी राहिली.’ ममताने आता बाळ परत करण्याचीही तयारी दाखविली आहे.