बच्चन उत्तर द्या, नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ?
By sagar.sirsat | Published: August 3, 2017 06:33 AM2017-08-03T06:33:51+5:302017-08-03T11:16:03+5:30
शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता. नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांनी उत्तर द्यावं.
भोपाळ, दि. 3 - शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील ग्राहक मंचाने अमिताभ बच्चन आणि नवरत्न तेल निर्माती कंपनी इमामी यांना ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दल उत्तर मागितलं आहे. ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली असून नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांना विचारणा केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जबलपूरचे रहिवासी पी.डी. बाखले यांनी येथील जिल्हा ग्राहक मंचाकडे नवरत्न तेलाची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवर ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुनील कुमार श्रीवास्तव यांनी अमिताभ बच्चन आणि इमामी कंपनी यांना समन्स जारी करून उत्तर मागितलं आहे.
बाखले यांचे वकील ओ.पी. यादव म्हणाले, ''अमिताभ बच्चन यांच्याकडून नवरत्न तेलाबाबत दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे. हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या नियमांचं उल्लंघन आहे. तेलाच्या जाहिरातीत अमिताभ म्हणतात की, हे तेल थंड थंड, कुल कुल आहे पण असं का आहे याबाबत ते काही सांगत नाहीत. यामध्ये कोणत्या घटकांचा किती प्रमाणात वापर करण्यात आलाय याबाबतही ते काही माहिती देत नाहीत. हे तेल नोंदणीकृत नाही किंवा या तेलाच्या नीर्मितीचा परवानाही नाही. जाहिरातीत डोकेदुखी, शरीराच्या वेदनांपासून मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं, त्यामुळे हे तेल आहे की औषध असा प्रश्न पडतो'' असं ते म्हणाले.
यापूर्वी काल शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश काशीनाथ सिंह यांनी सोमवारी शाहरुख खानसह चार जणांना नोटीस जारी केली आहे. या सगळ्यांना 26 ऑगस्टला न्यायालयात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राजकुमार पांडे नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. “शाहरुख खानने एका शेव्हिंग क्रीमची जाहिरात केली आहे. ही देशाची एक नंबर क्रीम असल्याचं सांगत या जाहिरातीद्वारे शाहरुख लोकांची दिशाभूल करत आहे,” असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.“ही क्रीम लावल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पुरळ आले. सरकारी रुग्णालयात त्यावर उपचार केले. ही क्रीम मध्यप्रदेश अन्न आणि औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवली. तपासणीत ही क्रीम वाईट दर्जाची असल्याचं समोर आलं,” असंही राजकुमार पांडे यांनी याचिकेत सांगितलं.