सामान्यांना आले बुरे दिन!
By admin | Published: July 22, 2016 04:29 AM2016-07-22T04:29:27+5:302016-07-22T04:29:27+5:30
सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत.
नवी दिल्ली : गगनाला भिडलेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सांगा, या लोकांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल आज काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत केला. तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आला आहात; पण वस्तुस्थिती ही आहे की, आता लोकच म्हणत आहेत की, यापेक्षा आपले बुरे दिनच बरे होते, असा टोमणाही त्यांनी मारला.
सरकारची आर्थिक धोरणंच असफल झाल्याची टीकाही तिवारी यांनी केली. राज्यसभेत शून्य काळात प्रमोद तिवारी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, सत्तारूढ पक्ष जेव्हा मत मागण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना महागाईच्या मुद्यावरून महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वेगाने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
>डाळी का भडकल्या?
प्रमोद तिवारी म्हणाले की, रोजच्या जगण्यातील प्रत्येक आवश्यक वस्तू महाग झाली आहे, तर किमतीतील ही दरवाढ सुरूच आहे. त्यांनी असाही आरोप केला की, सत्तेत बसलेल्या काही जणांनी खास लोकांशी हातमिळवणी केली आहे.
त्यामुळे आज डाळींच्या किमती प्रति किलो २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. महागाईमुळे भाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे. औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. निर्यातीत १८ मार्चपासून घट दिसून येत आहे.
>टोमॅटो, बटाटे, कांदे महागले
एका अहवालानुसार ही महागाई विशेषत: टोमॅटो, बटाटे, कांदे यांच्याशी संबंधित आहे. बटाट्यांच्या किमतीत दर दुसऱ्या वर्षी वाढ होते, तर कांद्याचे व टोमॅटोचे दरही दर अडीच वर्षांनी वाढतात. एक वर्षांच्या अंतराने विशिष्ट भाज्यांच्या, वस्तूंच्या बाबतीत ही महागाई दिसून येते. हाच तर्क गृहीत धरला तर पुढील वर्षी कांद्याचे भाव भडकू शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. वस्तूंच्या चढ्या दराला कधी मोठे व्यापारीही कारणीभूत असतात.