पडद्यावरचा ‘बॅड मॅन’... खऱ्या आयुष्यात ‘गुड मॅन’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:23 AM2019-07-26T03:23:48+5:302019-07-26T06:11:57+5:30
दिग्गजांच्या भावना : अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
नवी दिल्ली : चारशेहून अधिक चित्रपट, बहुतांश चित्रपटांमध्ये ‘व्हिलन’च्या भूमिका. चार दशकांच्या समृद्ध प्रवासात पडद्यावर ‘बॅड मॅन’ अशी प्रतिमा तयार होऊनही खºया आयुष्यात तो ‘गुड मॅन’ असलेले कलावंत गुलशन ग्रोव्हर यांच्या ‘बॅड मॅन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले तेव्हा त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या ओठी ‘स्वच्छ मनाचा माणूस’ हेच शब्द होते.
प्रकाशन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अभिनेत्री महिमा चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. सिकरी, फॅशन डिझाईन काऊन्सिलचे चेअरमन सुनील सेठी उपस्थित होते. पुस्तकाला ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांची प्रस्तावना, तर ब्लर्ब प्रसिद्ध उद्योजक टिना अंबानी यांचे आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी एवढी सगळी जुनी मंडळी भेटली, याबद्दल आनंद व्यक्त केला. वयाच्या ६३व्या वर्षीही तिशीतल्या तरुणाप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. दिल्लीच्या ज्या श्रीराम कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले, तेथील प्राचार्य सिमरित कौर, मित्र, अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा हेही उपस्थित होते. पेंग्वीन रँडम हाऊसेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. गुलशन ग्रोव्हर यांच्या चारशे चित्रपटांमध्ये पोलिश, स्पॅनिश, फ्रेंच चित्रपटांचा समावेश आहे.
‘बॅड मॅन’ शोधून सापडणार नाही : विजय दर्डा
गुलशन यांच्या स्वभावाने, व्यक्तिमत्त्वाने मला कायम आकर्षित केले. मी पत्रकारितेतील माणूस आहे, त्यामुळे मला त्यांच्यात बातमी दिसते. आम्ही जेव्हा त्यांना आमंत्रित केले, तेव्हा त्यांनी शब्द पाळला. त्यांच्यात ‘बॅड मॅन’ तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. त्यांनी सदैव लोकांना आनंद दिला आणि पुढेही देत राहतील. -विजय दर्डा, ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन