1200 जवान, 2000 CCTV, 20 लाख भाविक; बाबा बागेश्वर यांचा ‘दिव्य दरबार’ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:50 PM2023-07-05T19:50:18+5:302023-07-05T19:51:39+5:30
Bageshwar Dham: बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री त्यांच्या दिव्य दरबारमुळे नेहमी चर्चेत असतात.
Baba Bageshwar Dham:बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या दिव्य दरबारमुळे चर्चेत असतात. आता 9 जुलै ते 16 जुलै 2023 या कालावधीत उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे त्यांचा दिव्य दरबार होणार आहे. हा कार्यक्रम ग्रेटर नोएडाच्या जैतपूर मेट्रोजवळ आयोजित करण्यात आला आहे. या दिव्य दरबारमध्ये लाखो भाविक आणि अनेक व्हीआयपी हजेरी लावणार आहेत. त्यामुळेच या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
बाबा बागेश्वर यांचा कार्यक्रम
उत्तर प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणावर बाबा बागेश्वर यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव कानपूरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. बागेश्वर बाबांच्या सात दिवसीय 'दिव्य दरबारात' प्रत्येकासाठी विशेष व्यवस्था केली जात असल्याचा दावा मुख्य आयोजक शैलेंद्र शर्मा यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलश यात्रा 9 जुलै रोजी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सुमारे 1.25 लाख महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. 10 ते 16 जुलै या कालावधीत बाबांचे प्रवचन असेल. या काळात 12 जुलै रोजी दिव्य दरबार तर 14 जुलै रोजी सनातन धर्म सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणात तयारी सुरू
आयोजक शैलेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथे होणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाची भव्य तयारी करण्यात आली आहे. 4.5 लाख स्क्वेअर फुटांमध्ये 20 लाखांहून अधिक लोकांना बसण्यासाठी वातानुकूलित वॉटरप्रूफ जर्मन तंबू उभारले जात आहेत, जेणेकरून पावसातही कथेला कोणताही त्रास होऊ नये. जम्मूहून कार्पेट आणले जात आहेत आणि वृंदावनातून टनांनी फुले येतील.
मंडपात 2000 सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटची व्यवस्था असेल. उर्वरित जागा खुल्या राहतील. लोकांना राहण्यासाठी 200 खोल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मदतीने 10 वाहनतळ करण्यात आले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिसांनी कथेदरम्यान मार्ग वळविण्याची व्यवस्था केली आहे. 9 जुलै ते 16 जुलै या कालावधीत 24 तास कार्यक्रमस्थळी भंडारा असणार आहे. या कार्यक्रमासाठी 20 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मंत्री, दिग्गज नेते आणि समाजाशी संबंधित प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी होणार आहेत. याशिवा, प्रमुख धर्माचार्य, पीठाधीश्वर आणि प्रमुख संतांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. संपूर्ण घटनास्थळावर लक्ष ठेवण्यासाठी 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुमारे 1,200 पोलिस कर्मचार्यांसह, 1,000 हून अधिक स्वयंसेवक असतील, जे पोलिसांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवतील. महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.