धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? दरबारात कट्टा बाळगणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:38 PM2023-06-20T22:38:08+5:302023-06-20T22:40:57+5:30
धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाम दरबारात मोठी गर्दी असते. राज्याच्या विविध काना-कोपऱ्यातून येथे लोकं येतात.
भोपाळ - पंडित धीरेंद्र शास्त्रीच्या बागेश्वर धाममध्ये मंगळवारी एकच गोंधळ उडाला. कारण, बागेश्वर धामच्या दरबारात एक व्यक्ती अवैध बंदुकीचा कट्टा आणि जिवंत काडतुस घेऊन आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अवैध हत्यारासह पकडण्यात आलेला व्यक्ती हा मुस्लीम असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो व्यक्ती कुठल्या हेतुने येथे आला होता, याचा तपास पोलीस यंत्रणांकडून केला जात आहे.
धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाम दरबारात मोठी गर्दी असते. राज्याच्या विविध काना-कोपऱ्यातून येथे लोकं येतात. त्यामुळे, धीरेंद्र शास्त्री यांच्या खासगी सुरक्षेसह पोलीस यंत्रणांचीही येथे सुरक्षा असते. त्यातच, मंगळवारी येथील दरबारात एक व्यक्ती देशी कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन येथे आढळून आला. रज्जन खान असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगण्यात येतंय. तो शिवपुरी जिल्ह्याचा असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बागेश्वर धामच्या परिक्रमा मार्गाजवळ एक व्यकी संशयित हालचाली करताना दिसून आली. त्यानंतर, दरबारातील सेवकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी, पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता देशी कट्टा अन् जिवंत काडतुसं आढळून आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.