Bageshwar Dham : “मी कोणी चमत्कारी नाही, सनातन हिंदू धर्माशी समस्या असलेल्यांनी दुसऱ्या देशात जावं”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:06 PM2023-02-14T22:06:42+5:302023-02-14T22:07:10+5:30
"जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं.
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री गेल्या अनेक दिवसांपासून देश-विदेशात चर्चेत आहेत. त्यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं.
“मी कोणी चमत्कारी नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. मी केवळ बागेश्वर धामचा दास आहे. मी कोणी इश्वर नाही. आम्ही ध्यानसाधना करतो आणि देवाच्या कृपेनं सर्वकाही होतं. आम्ही जिकडेही जातो बालाजीकडून आशीर्वाद घेऊन जातो. आपल्या शिष्यांवर कृपादृष्टी ठेवावी अशी आम्ही प्रार्थना करतो आणि ती होते,” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
कला आणि दरबारमध्ये अंतर
धीरेंद्र शास्त्री यांनी मांईंड रिडर सुहानी शाह यांच्यावरही भाष्य केलं. “कला आणि दरबार यात फरक असतो. काच आणि मणी दिसण्यात एकसारखे असतात पण ते वेगळे आहेत. काच मण्याप्रमाणे चमकू शकते पण मण्यासारखं काम करत नाही. काचेची किंमतही मण्यासारखी असू शकत नाही. कलेला आम्ही नाकारत नाही. परंतु त्याची वैदिक परंपरेशी तुलना नाही. कलेत माईंड रिडिंगही येतं. दरबारात कृपा होते हे सर्वजण मानतात,” असंही त्यांनी नमूद केलं. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
आव्हानावर काय म्हणाले?
“आरोप करणाऱ्यांनी प्रभू श्रीरामालाही सोडलं नव्हतं, तर ते आम्हाला काय सोडतील. आम्हाला आरोप करणाऱ्यांशी काही समस्या नाही. बोलायला लोक माध्यमंही विकली गेल्याचं म्हणतात, पण सत्य निराळंच आहे. आम्हाला केवळ सनातनशी घेणंदेणं आहे. ज्यांनी कोणी आव्हान दिलंय त्यांनी आपलं सेटअप लावावं आम्ही जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणाच्या आव्हानाला घाबरुन पळालो नाही. ना आम्हाला कोणी आव्हानाबाबत लेखी पाठवलं, ना त्यांची कोणी व्यक्ती आली,” असंही धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तान भारताचा मुलगा
त्यांनी बोलताना पाकिस्तानबाबतही वक्तव्य केलं. “पाकिस्तान भारताचा मुलगा आहे आणि आम्ही पिता पुत्राची भेट घडवणार. जगात जितकेही भारतीय आहेत त्यांच्या शरीरात राम-कृष्णाचं रक्त आहे. आमची योजना सनातन, हिंदू राष्ट्र आणि अखंड भारताची आहे. संविधानाच्या पहिल्या पानावर प्रभू श्रीरामाचं चित्र आहे. यामुळेच आम्ही संविधानानुसार हिंदू राष्ट्र बनवू,” असं ते म्हणाले.
भगावा-ए-हिंद का नाही?
“हिंदुस्तानात हिंदू राहतात तर याला हिंदू राष्ट्र का बनवू नये. या ठिकाणी राहणारे मुस्लीम, शीख, ख्रिश्चन धर्माची लोकं हिंदू आहेत. जगातील असे अनेक देश आहेत ज्यांना इस्लामिक देश म्हटलं जातं. कारण त्या ठिकाणी मुस्लीम आहेत. गजवा ए हिंद असू शकतं तर भगवा ए हिंद का नाही. आम्ही लोकांना जागरुक करू, हिंदू राष्ट्राचे फायदे सांगू आणि त्यांना शपथ देऊ. जेव्हा देशातील एक तृतीयांश लोक बोलतील तेव्हा सरकारला त्यांचं ऐकावं लागेलच,” असंही त्यांनी नमूद केलं.
लग्न कधी करणार ?
आईचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जेव्हा एखादी कथा असते तेव्हा आईही येते. आई ही आई असते, तिची ममता इतरांपेक्षा वेगळी असते. आईनं माझ्यासाठी खूप संघर्ष केला आहे. समाजसेवेमुळे त्यांची तिची फारशी भेट होऊ शकली नाही. आई अजूनही मला ओरडते. झोपण्यापासून ते खाण्यापर्यंत आईचा ओरडा आजही खावा लागतो. आई विवाहाबद्दलही बोलत असते. मी त्याबद्दल विचार करत आहे. येत्या दोन तीन वर्षांत विवाह करेन. आई-वडिल माझ्यासाठी मुलगी शोघतील असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.