Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: “साईबाबा संत असू शकतात, पण ते देव नाहीत”; बागेश्वर बाबाच्या विधानाने पुन्हा खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 12:26 PM2023-04-02T12:26:52+5:302023-04-02T12:28:31+5:30
Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साई बाबा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बागेश्वर बागेश्वर बाबा यांनी आता कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला आहे. साई बाबा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
जबलपूर येथे बागेश्वर बाबांच्या श्रीमद्भगवत कथेचा शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. अनेक भाविकांच्या भक्तांच्या प्रश्नांना उत्तर दिली. या प्रश्नोत्तरावेळी साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही? असा प्रश्न बागेश्वर बाबा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबा म्हणाले की, गिधाडाचे चामडे पांघरून कोणी सिंह होत नाही, असे विधान केले.
साईबाबा संत असू शकतात, पण ते देव नाहीत
बागेश्वर बाबा यांनी थेट साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला. यावेळी बागेश्वर बाबा म्हणाले की, आपल्या शंकराचार्यांनी साई बाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांचे म्हणणे हे बंधनकारक आहे. प्रत्येक सनातनी धर्माने शंकराचार्यांचे ऐकले पाहिजे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणताही संत असतील, मग ते आपल्या धर्माचा का असेना, ते देव होऊ शकत नाहीत. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही. आम्ही कुणाच्याच भावनेचा अपमान करत नाही. पण साई बाबा संत असू शकतात. फकिर असू शकतात. पण ते देव होऊ शकत नाही, असे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, अलीकडेच बागेश्वर बाबा यांचा मुंबईतील मीरा रोड येथे भव्य दरबार भरला होता. या दरबाराला लाखो भविकांनी उपस्थिती लावली होती. तसेच बागेश्वर बाबांनी १० लोकांची खरी खरी माहिती द्यावी. त्यांनी १० लोकांची योग्य माहिती दिल्यास त्यांना ३० लाख रुपये दिले जाईल, असे थेट आव्हान देण्यात आले होते. यावर, कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु आपल्याला कोणालाही पुरावे देण्याची गरज नाही. ज्यांना आपल्यापासून समस्या आहे, त्यांनी दरबारात येऊन पुरावा घ्यावा. विरोध करणाऱ्यांनी येऊन अर्ज करावा. आपण प्रत्येक गोष्टी सांगू, असा पलटवार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी विरोधकांवर केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"