कोरोना किंवा दहशतवादी हल्ल्याबाबत तुम्हाला आधीच का समजले नाही?; बागेश्वर महाराज म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:39 AM2023-01-22T10:39:42+5:302023-01-22T10:41:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना बागेश्वर महाराज म्हणून देखील ओळखले जाते. खरंतर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात याच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्याच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप घेतला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे.
कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे बागेश्वर महाराज नेहमीच सोशल मीडिया आणि समाज माध्यमांमध्ये ट्रेडिंगमध्ये असतात. सध्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्तवाहिनीने बागेश्ववर महाराज यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना विचारले की, तुम्ही आजपर्यंत अनेकांना मदत केली असेल. तुम्ही अनेक भक्तांना वाचवले देखील असेल. मात्र आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, तुम्ही असे काही काम केले आहे की ज्याने देशाचे भले झाले असेल. म्हणजेच, कोरोना महामारी येणार आहे, हे तुम्ही आधीच सांगितले होते का?, दहशतवादी हल्ला होणार आहे? जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला बरे करण्याबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही देशासाठी देखील असे करू शकता का?, असे विविध प्रश्व विचारले.
सदर प्रश्नाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी भविष्य सांगणारा नाही आणि ज्योतिषीही नाही. पण जेव्हा कोणी अर्ज घेऊन माझ्या दरबारात येतो तेव्हा त्याला त्याच्या आंतरिक प्रेरणेने आणि भावनेच्या आधारे त्याची समस्या आणि त्यावर असणारे उपाय मी सांगतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा राजकारणी मला भेटायला येतो तेव्हा तो विचारतो की राज्याची स्थिती काय असेल? त्यावर तेव्ही मी त्यावर योग्य उपाय सांगतो. पण कुणी अर्जच केला नसेल, तर त्यावर समस्या आणि उपाय सांगता येत नाही, असं स्पष्टीकरण धीरेंद्र शास्त्री यांनी दिलं.
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, जेव्हा कोणीही अर्ज करत नाही, मग मी स्वतः देशाच्या आणि जगाच्या तात्कालिक समस्याबद्दल कसं सांगू?, असं ते म्हणाले. तसेच मी जर एखादी सूचना किंवा तोडगा दिला तर तो कोण स्वीकारणार? नियम कोण पाळणार?, असा सवाल धीरेंद्र शास्त्री यांनी उपस्थित केले. तसेच मी दररोज देशाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असल्याचं धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले.
नेमका वाद काय?
दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र महाराजांना श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. अंनिसने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असं जाहीर आव्हान दिलं होतं. त्यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेले होते. त्यामुळं या प्रकरणाची खूप चर्चा रंगली होती.
कोण आहेत बागेश्वर महाराज?
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म १९९६ साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे. हे त्यांच्या दिव्य दरबारामध्ये सनातन धर्माचा पुरस्कार करत हिंदूंच्या संरक्षणासाठी सनातन धर्म टिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगतात.