Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:59 PM2024-06-04T14:59:07+5:302024-06-04T14:59:58+5:30
Baharampur Lok Sabha Result 2024 : युसूफ पठाण आघाडीवर.
Lok sabha Election Result 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात आहे. पश्चिम बंगालमधील बहरामपूर या जागेवरून तो नशीब आजमावत आहे. इथे काँग्रेस उमेदवार अधीर रंजन चौधरी आणि भाजप उमेदवार डॉ. निर्मल कुमार शाह यांच्याशी युसूफची लढत आहे. मतांची मोजणी सुरू असून, आतापर्यंतचा कल युसूफच्या बाजूने लागला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू २३ हजार १४८ मतांनी आघाडीवर आहे. (Lok Sabha Elections Result 2024, Yusuf Pathan)
जर आपण विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले तर, बहरामपूरमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागा टीएमसीकडे आहेत, तर एक जागा भाजपकडे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी टीएमसीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला. मूळचा गुजरातचा असलेला युसूफ पठाण फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे आभार मानले होते. मुस्लिम मतदारांची संख्या पाहता टीएमसीने युसूफला लोकसभेच्या मैदानात उतरवले.
बहरामपूर मतदारसंघातील जातीय समीकरण
बहरामपूर लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही समुदायातील लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. २०१९ ची निवडणूक पाहिली तर या जागेवर १६ लाख ३२ हजार ८७ मतदार होते. त्यातील मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल ८ लाख ४८ हजार इतकी होती. म्हणजे ५२ टक्के मतदार हे मुस्लीम समुदायातील होते. तर बहरामपूर लोकसभा जागेवर १३ टक्के एससी, १ टक्के एसटी मतदारही आहेत.
ममता बॅनर्जींची खेळी!
पश्चिम बंगालमधील 'इंडिया' आघाडी तुटण्याचे कारण अधीर रंजन चौधरी असल्याचे बोलले जाते. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि टीएमसीमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. अधीर रंजन चौधरी १९९९ पासून बहरामपूरचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या अपूर्ब सरकार यांचा पराभव केला. अधीर रंजन यांची त्यांच्या लोकसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. टीएमसीने युसूफ पठाणला उमेदवारी देण्यामागील कारण म्हणजे बहरामपूर हा मुस्लिमबहुल भाग आहे. युसूफ पठाणला तिकीट देऊन टीएमसीने अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.