बाहुबली विजयी होण्याची या राज्यात परंपराच!
By admin | Published: February 21, 2017 01:09 AM2017-02-21T01:09:27+5:302017-02-21T01:09:27+5:30
तुरुंगात असलेले अनेक बाहुबली यंदाही निवडणुकीच्या मैदानात आहेत. काही जण तुरुंगातून भाग्य आजमावत आहेत, तर
सुरेश भटेवरा / कुंडा (प्रतापगड)
तुरुंगात असलेले अनेक बाहुबली यंदाही निवडणुकीच्या मैदानात आहेत. काही जण तुरुंगातून भाग्य आजमावत आहेत, तर काहींची चौकशी सुरू आहे. ज्यांचा पूर्वेतिहास वादग्रस्त आहे, त्यात मुख्तार अन्सारी, अमनमणी त्रिपाठी, राजा भय्या, शेखर राजा, अमित गर्ग, मनीष सिंग ही प्रमुख नावे आहेत.
कुंडामधून रघुराज प्रतापसिंग उर्फ राजाभय्या १९९३ पासून सलग ५ वेळा अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यांना १९९३ व १९९६ साली भाजपचा, तर २00२ पासून २0१२ पर्यंत समाजवादी पक्षाचा पाठिंबा होता. भाजपच्या कल्याणसिंग, रामप्रकाश गुप्ता व राजनाथसिंग मंत्रिमंडळात व त्यानंतर मुलायमसिंग व अखिलेश यादव मंत्रिमंडळात ते होते. यंदा करवत निशाणी घेउन ते सहाव्यांदा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. ते यंदाही विजयी होतील, असे दिसते
राजाभय्या वादग्रस्तच आहेत. मायावती यांनी त्यांना तुरुंगात टाकले होते. मुलायमसिंग सत्तेवर येताच त्यांचा ‘पोटा’ रद्द झाला आणि ते कॅबिनेट मंत्री झाले. कुंडा मतदारसंघात २0१३ साली वलीपूरध्ये दोन गटांची हाणामारी सोडवायला गेलेले पोलीस उपअधक्षीक झिया उल हक यांची जमावाने गोळ्या झाडून हत्या केला. या आरोपावरून राजाभय्यांना मंत्रिपद सोडावे लागले. सीबीआय चौकशीत पुराव्याअभावी क्लीन चीट मिळताच ते पुन्हा मंत्री झाले. राजाभय्यांवर अखिलेश खुश नसल्याची चर्चा आहे.
कुंडा येथील कार्यालयात, त्यांचे जनसंपर्क प्रमुख ग्यानेंद्रसिंग भेटले. राजाभय्या जनतेत लोकप्रिय कसे? असा सवाल विचारताच ते म्हणाले, राजाभय्यांमुळे कुंडात गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. गोरगरीब जनतेला ते ‘न्याय’ मिळवून देतात. लोकांना वर्षानुवर्षे न्यायालयाची दारे ठोठवावी लागत नाहीत. गरीब रूग्णांना ते विनाविलंब मदत करतात. राजाभय्यांवर बाळासाहेब ठाकरेंचे नितांत प्रेम होते. मातोश्रीवर तिलक लावून त्यांनी त्यांचे स्वागत केले होते.
पूर्वांचलचे बाहुबली मुख्तार अन्सारी दरवेळी तुरुंगातूनच निवडणूक लढवतात. यंदा प्रचारासाठी न्यायालयानेत्यांना पॅरोल मंजूर केला. मात्र हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. बसपाच्या तिकिटावर मऊ मधून ते उभे आहेत. मायावतींनी त्यांचे बंधू सिबगतुल्लाह व थोरला मुलगा अब्बास यांनाही उमेदवारी दिली आहे. यंदा स्वत:सह तिघांसाठीही मुख्तार अन्सारी तुरुंगातून मते मागत आहेत. अन्सारी बंधूंमुळे पूर्वांचलातल्या काही मतदारसंघांत बसपाला फायदा होण्याची शक्यता आहे.
अनेक जण लढत आहेत तुरुंगामधूनच
मधुमिता हत्याकांडामुळे चर्चेत असलेले अमरमणी त्रिपाठी व त्यांच्या पत्नी मधुमणी तुरुंगात आहेत. मुलगा अमनमणीला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक झाली आहे. नौतनवामधून अमनमणी उभे आहेत. त्यांच्यासाठी धाकटी बहीण मते मागत फिरते आहे.
वाराणसी तुरुंगातून आमदार बृजेशसिंगांचे पुतणे सुशीलसिंग व माजी आमदार विनितसिंग एकमेकांविरुद्ध उभे आहेत. हा तुरुंग राजकारणाचे केंद्र आहे. आग्रा तुरुंगातून अमित गर्ग फिरोजाबादहून, लखनौ तुरुंगातले बाहुबली भगवतीसिंग यांचे पुतणे मनिष सिंग रायबरेलीच्या हरचंदपुरातून तर पारसनाथ यादव मल्हनीमधून भाग्य आजमावित आहेत.
कैदेतील अनेक बाहुबलींचे निकटचे नातेवाईकही मैदानात आहेत. किमान १0 ते १५ बाहुबली यंदा विजयी होतील, असा अंदाज आहे.