Harsha Murder Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 आरोपींना अटक, कर्नाटकात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:56 PM2022-02-23T12:56:58+5:302022-02-23T12:58:30+5:30
Harsha Murder Case : कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली.
नवी दिल्ली : कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गा जिल्ह्यातील (Shivamogga District) बजरंग दलाचा (Bajrang Dal) कार्यकर्ता हर्षाच्या हत्येप्रकरणी (Harsha Murder Case) पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. दरम्यान, शिवमोग्गा येथील काही भागात मात्र तणावाचे वातावरण आहे.
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, तर काही लोक फरार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. मंगळवारी सकाळी शहरात जाळपोळ आणि हाणामारीच्या तुरळक घटना घडल्या होत्या. दरम्यान, पीडितेच्या बहिणीने हर्षाच्या निर्घृण हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आणि लोकांना धर्मांधता सोडण्याचे आवाहन केले. माणुसकीला काही किंमत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, शिवमोग्गा एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकूण 12 जणांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 8 आरोपींचे वय 20 ते 22 दरम्यान आहे.
दरम्यान, 20 फेब्रुवारीला हर्षाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, शस्त्रांचा वापर केला आणि वाहनांची जाळपोळही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. तसेच, वाढता तणाव पाहता परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी पीडित कुटुंबीयांशी भेटून संवाद साधला.