"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 08:10 PM2023-12-24T20:10:37+5:302023-12-24T20:17:05+5:30

आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणताही पुरस्कार मोठा नाही...आधी न्याय मिळाला पाहिजे", असे बजरंग पुनिया म्हणाला आहे. 

bajrang punia on wfi suspension says will not take back padma shri until justice delivered | "...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

नवी दिल्ली : न्याय मिळेपर्यंत मी पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही, असे विधान कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी भारतीय कुस्ती महासंघाची (WFI) मान्यता रद्द केल्यानंतर रविवारी (२४ डिसेंबर) केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "मी पद्मश्री परत घेणार नाही. मला न्याय मिळाल्यावरच मी याचा विचार करेन. आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणताही पुरस्कार मोठा नाही...आधी न्याय मिळाला पाहिजे", असे बजरंग पुनिया म्हणाला आहे. 

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह यांच्या निवडीच्या निषेधार्थ बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. शुक्रवारी (२२ डिसेंबर) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विरोधाचे पत्र सादर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दिल्लीच्या कर्तव्य पथावर जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. यानंतर बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार आणि पत्र फूटपाथवर ठेवले होते.

बजरंग पुनियाला २०१९ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघावर नव्याने निवडून आलेल्या संजय सिंह आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याबरोबरच केंद्रीय मंत्रालयाने नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले आहे. क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय संजय सिंह यांच्यासह भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. कारण, संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे अत्यंत खास म्हणून ओळखले जातात.  

आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावे का? बजरंग पुनियाचा पत्रात सवाल
ब्रिजभूषण यांच्याविरोधातील पहिले आंदोलन सरकारच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. तीन महिने उलटूनही एफआयआर दाखल न झाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागले. आंदोलन ४० दिवस चालले. आमचे आंदोलनाचे स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हा आमची पदके गंगार्पण करण्याचा विचार केला होता; पण आम्हाला प्रशिक्षक व शेतकऱ्यांनी तसे करू दिले नाही. त्याचवेळी तुमच्या एका मंत्र्याचा फोन आला. त्यांनी आम्हाला परत येण्यास सांगितले.आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन थांबवले. २१ डिसेंबर रोजी ब्रिजभूषण पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यांनी 'आपले वर्चस्व आहे आणि कायमच राहील' असे विधान केले. 'आम्ही सर्वांनी रडत रात्र काढली. कुठे जावे, काय करावे समजत नव्हते. सरकार व लोकांनी खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?' अशी भावना पुनियाने या पत्रात व्यक्त केली. 
 

Web Title: bajrang punia on wfi suspension says will not take back padma shri until justice delivered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.