Bakra Eid 2018 लखनऊत बकऱ्यांऐवजी केक कापून साजरी होणार इको-फ्रेंडली ईद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 10:48 AM2018-08-22T10:48:40+5:302018-08-22T10:50:45+5:30
Bakra Eid 2018 लखनऊत काही मुस्लिम बांधवांनी इको-फ्रेंडली बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनऊ - देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. मात्र लखनऊत काही मुस्लिम बांधवांनी इको-फ्रेंडली बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बकऱ्याची कुर्बानी न देता त्याजागी बकऱ्याचे चित्र असलेला केक कापला जाणार आहे.
People in #Lucknow are preparing to celebrate an eco-friendly #Bakrid by cutting cakes with a goat image. A buyer at a bakery says, “The custom of sacrificing an animal on Bakrid is not right. I appeal to everyone to celebrate the festival by cutting a cake instead of an animal.” pic.twitter.com/C5EJ73dKM1
— ANI UP (@ANINewsUP) August 21, 2018
लखनऊमधील एका बेकरीत बकऱ्याचे चित्र असलेले विशेष केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ‘बकरी ईदला बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा योग्य नाही. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी बकरी ईदला जनावराचा बळी न देता केक कापून साजरी करावी’ असं केक खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितले आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर बकरी ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन शिया मौलवी मौलाना सैफ अब्बास यांनी याआधी केलं होतं. नमाज पठण करा, बकऱ्यांचा बळी द्या मात्र शांततेत करा असं त्यांनी सांगितलं होतं. देशातील काही प्रमुख मुस्लिम संघटनांनी बकरी ईदला गाय किंवा बैलाचा कुर्बानी देऊ नये असं आवाहन केलं होतं.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना राबे हसनी नदवी, जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन उमरी आणि इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद यांनी मुस्लिम बांधवांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बकरी ईदला गोवंशाची हत्या करु नका असं आवाहन केलं. देशातील मुस्लिम बांधवांनी सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर कुर्बानी देऊ नये अशी स्पष्ट ताकीदच देण्यात आल्याचं मौलाना रशीद यांनी सांगितले.