बहादूर ‘मानसी’चे देशासाठी बलिदान
By admin | Published: August 11, 2015 02:47 AM2015-08-11T02:47:24+5:302015-08-11T02:47:24+5:30
देशासाठी बलिदान देण्याचा प्रसंग आला तेव्हा ‘मानसी’ मागे हटली नाही. आणि तिने उत्तर जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमधील मोहिमेत दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना आपले
श्रीनगर : देशासाठी बलिदान देण्याचा प्रसंग आला तेव्हा ‘मानसी’ मागे हटली नाही. आणि तिने उत्तर जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमधील मोहिमेत दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना आपले जीवन देशासाठी समर्पित केले.
‘मानसी’ ही चार वर्षांची एक लॅब्रोडोर श्वान होती. आणि तिची देखभाल करणारा बशीर अहमद वार प्रादेशिक सेनेतील जवान होता. दोघेही येथून १५० कि.मी. अंतरावरील तंगधारमध्ये सीमेपलीकडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबाराचे लक्ष्य ठरले.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मानसी आणि वार दोघेही कुपवाडाचे राहणारे होते. घनदाट जंगलात त्यांची तैनाती करण्यात आली होती. शनिवार आणि रविवारदरम्यानच्या रात्री दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून या भागात घुसखोरी केली होती. लष्कराच्या श्वान पथकाची सदस्य असलेल्या मानसीला शत्रूच्या हालचालींची चाहूल लागली होती. ती बशीर अहमद वार यांना त्या दिशेने घेऊन गेली. मानसीने घुसखोरांवर भुंकणे सुरू करताच त्यांनी तिला गोळ्या घातल्या. तिची देखभाल करणाऱ्या जवानाने सुरक्षा दलाला बोलावण्यासोबतच घुसखोरांसोबत संघर्ष सुरू ठेवला. त्यांना आपल्या प्रिय मित्राच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. शेवटी मृत्यूही या दोघांना विभक्त करू शकला नाही. वारही शत्रूसोबतच्या लढ्यात शहीद झाले. (वृत्तसंस्था)
युद्धाच्या मैदानात श्वान जखमी झाला, तर एखाद्या जवानाप्रमाणेच त्याची देखभाल केली जाते. येथे आम्ही दोन जीव गमावले आहेत. वार यांचे पार्थिव संपूर्ण लष्करी इतमामाने त्यांच्या मूळ गावी नेण्यापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर मानसीच्या मृतदेहावरही आवश्यक कारवाईनंतर पुष्पांजली वाहण्यात आली.