काेराेमंडल अपघात : मृतदेहांच्या ढिगाऱ्यांतही दाेन भाऊ वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:34 AM2023-06-06T05:34:04+5:302023-06-06T05:34:24+5:30
‘देव तारी त्याला काेण मारी’ याची प्रचिती ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर पुन्हा एकदा आली. जसजशी माहिती समाेर येऊ लागली, ती ऐकून सारेच थक्क झाले आहेत.
बालासाेर : ‘देव तारी त्याला काेण मारी’ अशी मराठीत म्हण आहे. ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघात याची पुन्हा एकदा प्रचिती आली. अपघाताच्या दाेन दिवसांनंतरही अनेकजण बालंबाल बचावले. त्यांच्याबाबत जसजशी माहिती समाेर येऊ लागली, ती ऐकून सारेच थक्क झाले आहेत. काेणी मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली अनेक तास जिवंत राहिला, तर ऐनवेळी दुसऱ्या डब्यात गेल्यामुळे काही प्रवाशांवर अपघाताचा परिणाम झाला नाही.
मृतदेहांच्या खाली दबले होते दोन भाऊ
बालासाेर जिल्ह्यातील १० वर्षांचा देवाशिष पात्रा अपघातानंतर सात मृतदेहांच्या खाली दबला हाेता. स्थानिक लाेकांच्या मदतीने त्याचा भाऊ सुभााषिशने त्याला बाहेर काढले. सुभाषिश म्हणाला की, अपघातानंतर डब्यात अंधार झाला. मी बेशुद्ध झालाे. शुद्धीवर आलाे तेव्हा शरीरात प्रचंड वेदना हाेत हाेत्या. मीदेखील मृतदेहांखाली दबलाे हाेताे. माेबाइलच्या प्रकाशात भावाला शाेधले. दाेन्ही भावांवर उपचार सुरू आहेत.
आई-वडिलांजवळ थांबला, वाचले प्राण
काेराेमंडल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारा १६ वर्षीय जाॅर्ज दास त्याच्या आईवडिलांसाेबत प्रवास करीत हाेता. आई-वडील बी-२ या डब्यात हाेते, तर जाॅर्जला बी-८ डब्यात जागा मिळाली. टीसीला विनंती करूनही त्याला बी-२ मध्ये जागा मिळाली नाही. शेवटी ताे जेवण करण्यासाठी आई-वडिलांजवळ थांबला. त्याचवेळी माेठा आवाज ऐकू आला आणि गाडी हलू लागली. बाहेर येऊन पाहताे, तर भीषण दृश्य समाेर हाेते. बी-८ डब्यातील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला हाेता.
४८ तासांनंतर तरुण बेशुद्धावस्थेत सापडला
अपघाताच्या ४८ तासांनंतर एक प्रवासी जिवंत सापडला. अपघाताच्या वेळी तो डब्यातून फेकला गेला आणि झुडपात बेशुद्ध पडला. दिलाल असे त्याचे नाव असून, तो आसामचा रहिवासी आहे. रुग्णालयात नेल्यानंतर त्याला शुद्ध आली.
पाेस्टमार्टेम टेबलावरून मुलाला आणले जिवंत
हावडा येथील एका २४ वर्षीय बिस्वजित मलिक याला मृत समजून तात्पुरत्या शवागारात ठेवले हाेते. मृतदेहांच्या ढिगाऱ्यात त्याच्या वडिलांनी अचानक एका मृतदेहाचा हात थरथरताना पाहिला. त्यांनी ओरडून सर्वांना सांगितले. नशिबाने ताे हात त्यांच्या मुलाचाच हाेता. ताे बेशुद्ध हाेता. डाॅक्टरांनी तपासणी करून त्याला वडिलांच्या ताब्यात दिले. ते काेलकाता येथे त्याला घेऊन आले. त्याच्यावर काही शस्त्रक्रिया हाेणार आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे.
लेकीच्या हट्टामुळे वडिलही बचावले
एम.के. देब हे त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीसाेबत एसी डब्यातून प्रवास करीत हाेते. ते खडकपूर येथून गाडीत बसले. त्यांची जागा खिडकीजवळ नव्हती आणि मुलीला खिडकीजवळच बसायचे हाेते. मुलीच्या हट्टाखातर त्यांनी काही प्रवाशांना जागा बदलण्याची विनंती केली. दाेन डबे साेडून तिसऱ्या डब्यातील दाेन प्रवासी जागा बदलण्यास तयार झाले. ते ज्या डब्यात गेले, ताे डबा सुरक्षित हाेता. ज्यांनी जागा बदलली, त्या प्रवाशांचे काय झाले, हे मात्र कळले नाही.