उपचारासाठी आईच्या कुशीत तासभर ताटकळला; 'एम्स'बाहेर माणुसकी हरवली, कुणीही दखल घेतली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 03:28 PM2021-07-23T15:28:37+5:302021-07-23T15:29:42+5:30
अनेक तास तरूण एम्स बाहेर उपचारासाठी होता ताटकळत. सकाळी आठ वाजल्यापासून बाहेर आई आणि मुलगा बसले होते.
उपचारासाठी आपल्या आईच्याच कुशीत तरूण तासभर एम्स रुग्णालयातील ओपीडी बाहेर ताटकळत बसल्याची दुर्देवी घटना घटली. तरूण हा आपल्या आईसह रुग्णालयात उपचारासाठी आला होता. परंतु अनेक तास त्याला त्या ठिकाणी ताटकळत बसावं लागलं. त्याच्या आईनं अनेकांकडे मदतीची विनवणी केली, परंतु डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. परंतु दुपारनंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं.
वल्लभगढ येथील रुग्णालयात रुग्णांवर चांगल्या उपचारांसाठी आणि उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी एम्सची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात इमारत तर उभी राहिली परंतु रुग्णांच्या आरोग्य सेवांची सुविधा मात्र योग्य नाही. गुरूवारी त्या ठिकाणी अशीच काहीशी घटना पाहायला मिळाली. मूळ बिहारच्या रहिवासी असलेल्या सुलेना देवी यांनी आपला मुलगा प्रदीप यांना अधिक ताप असताना त्याच परिस्थितीत सकाळी आठ वाजता रुग्णालयात आणलं होतं. परंतु रुग्णालयातील ओपीडीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होती.
सुलेना देवी यांनी अनेक तास तेथील कर्मचाऱ्यांना विनवणी केली. परंतु कोणीही त्यांची मदत केली नाही. त्या आपल्या मुलाला घेऊन ओपीडीच्या बाहेरच जमिनीवर बसून राहिल्या. त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं.
"सध्या मला या प्रकरणाची माहिती नाही. सध्या मी रजेवर आहे. जर तरूणाच्या उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा केला गेला असेल तर त्या प्रकरणी लक्ष घालू," अशी प्रतिक्रिया वल्लभगढच्या एम्स ओपीडीच्या हर्ष साळवे यांनी दिली.