'ISI ने केलं कुलभूषण जाधवांचं अपहरण, मुल्ला उमरला दिले कोट्यवधी रुपये'; बलूच नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 08:11 AM2018-01-19T08:11:05+5:302018-01-19T11:19:47+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील कारागृहात यातना सहन करणारे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे पाकिस्तानाची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावरुन इराणमधील चाबहार येथून अपहरण करण्यात आले होते, असा दावा बलूच नेता मामा कदीर यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कदीर यांनी हा दावा केला आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या मुल्ला उमर बलूच इराणीनं जाधव यांचं इराणच्या चाबहार येथून अपहरण केले, असा दावा कदीर यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे. व्हॉईस फॉर मिसिंग बलूच नावाच्या संघटनेकडून याबाबत माहिती मिळाल्याचे कदीरनं सांगितले आहे. कदीर या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.
''आमचे संयोजक तेथे उपस्थित होते. जाधव यांच्या अपहरणासाठी आयएसआयकडून मुल्ला उमरला कोट्यवधी रुपये देण्यात आले होते'',असेही कदीर यांनी सांगितले. मुल्ला उमर हा आयएसआयचा एजंट म्हणून कुख्यात असून पाकिस्तान सरकारविरोधात आवाज उठवणा-यांचं अपहरण करणारा आयएसआयचा एजंट म्हणून तो ओखळला जातो.
पुढे त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाबाबत अशी माहिती दिली की, जाधव यांच्या डोळ्यांवर पट्टी लावून त्यांचे दोन्ही हात बांधण्यात आले होते आणि त्यांना एका कारमधून सुरुवातीला चाहबहारहून इराण आणि बलुचिस्तान सीमा परिसरातील मशकेल शहरात नेले गेले, येथून क्वेटा व त्यानंतर इस्लामाबादमध्ये आणण्यात आले.
''कुलभूषण जाधव इराणमध्ये एक व्यावसायिक होते, याची माहिती आम्हाला होती. दरम्यान, बलुचिस्तानमध्ये जाधव यांना पकडल्याची घोषणा आयएसआयनं केली. पण जाधव कधीही बलुचिस्तानमध्ये आले नव्हतेच''. कदीर यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या 46 वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी 13 डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती.