२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडून रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 07:16 PM2023-12-12T19:16:01+5:302023-12-12T19:16:33+5:30
२२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
नवीन वर्षात अयोध्येत २२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. मागील काही दशकापासून देशाचं राजकारण ज्या वास्तूभोवती फिरत होतं ती वास्तू म्हणजे उत्तर प्रदेशामधील अयोध्येतील राम मंदीर. खरं तर मंदिराचं थोडेच काम बाकी आहे. रामलला लवकरच भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत. यासाठी संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. याच आनंदात २८ वर्षीय तरुण पुण्यातील नोकरी सोडून प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी सायकलनं प्रवास करत अयोध्येला रवाना झाला. वाटेत भेटणाऱ्या लोकांना सनातन धर्माचे महत्त्व सांगत तो अयोध्येच्या दिशेने निघाला. तसेच राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येण्याचे निमंत्रणही तो देत आहेत.
नोकरी सोडून रामललाच्या दर्शनाला
संबंधित तरुण १७ दिवस सायकलवरून प्रवास करत अयोध्येला पोहचेल. १५ जानेवारीला तो अयोध्येला पोहोचेल आणि राम ललाच्या दरबारात दर्शन घेईल. हा तरुण उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. बलराम वर्मा असे त्याचे नाव असून तो पुण्यातील एका कॅन्टीनमध्ये कामाला होता. एक वर्षापासून रामलला मंदिरात विराजमान झाल्याच्या बातम्या ऐकत होत्या, तारीख जवळ आल्यावर त्याने अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. कॅन्टीनमधील नोकरी सोडून त्याने सायकलने त्याच्या प्रवासाला सुरूवात केली. प्रथम तो शिर्डी येथे पोहोचला आणि तिथे साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरूवात केली.
दरम्यान, बलराम शनी शिंगणापूरमार्गे मध्य प्रदेशात दाखल झाला. प्रथम खांडव्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या ओंकारेश्वरला तो पोहोचला, तिथे प्रार्थना केल्यानंतर त्याचा पुढील प्रवास सुरू झाला. त्यानंतर उज्जैनमध्ये महाकाल मंदिराला त्याने भेट दिली. तिथून तो सागरमार्गे बागेश्वर धामला जाणार आहे. बागेश्वर धाम येथे नतमस्तक होऊन तो चित्रकूटमार्गे अयोध्येकडे कूच करेल. जवळपास २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणार असल्याचे बलराम वर्माने सांगितले. दिवसाला ५० किलोमीटरपर्यंत प्रवास करून संध्याकाळी मंदिरात किंवा जिथे विश्रांतीसाठी जागा भेटेल तिथे तो मुक्काम करतो.