विमानात ई-सिगारेटच्या वापरावर बंदी
By Admin | Published: November 1, 2016 05:46 AM2016-11-01T05:46:41+5:302016-11-01T05:46:41+5:30
विमानातील केबिन सुरक्षेच्या दृष्टीने नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
नवी दिल्ली : विमानातील केबिन सुरक्षेच्या दृष्टीने नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केबिन सुरक्षेच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट हाताळण्यासंबंधीचे धोरण तयार करून इशारा देणारे फलक प्रसाधनगृह आणि विविध ठिकाणी लावले जावेत. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या कार्डावरही त्याबाबत सूचना केल्या जाव्यात, असे निर्देश डीजीसीएने घरगुती विमान कंपन्यांना दिले आहेत.
आज मंगळवारपासून अंमलात आलेल्या केबिन सुरक्षा नियमावलीअंतर्गत कंपन्यांनी वॅलेट वा स्कॉय चेक अथवा बॅगमधून इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट काढून घेण्यासाठी प्रवाशांना सल्ला देणारी प्रक्रिया सुनिश्चित करावी, असेही डीजीसीएने म्हटले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स निकोटीन डिलेव्हरी सिस्टिम्स (ईएनडीएस) ही ई-सिगारेट नावाने प्रसिद्ध आहे. या सिगारेटची निर्मिती स्वादाचा तरल पदार्थ आणि निकोटीनच्या मिश्रणापासून केली जाते. ई-सिगारेट लिथियम बॅटरीद्वारे शिलगावली जाते. प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांना (क्रू) नकली धूम्रपान सामग्रीच्या उपयोगावर प्रतिबंध आहे. प्रवाशांना विमानात चढताना कंपनीने अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तूंच्या उपयोगाला परवानगी देऊ नये, असे डीजीसीएने म्हटले आहे.
अमेरिकन अन्न व प्रशासन विभागाने मात्र अद्याप धूम्रपान थांबविण्यासाठी कोणतेही नियमन अथवा प्रतिबंध अद्याप लावलेले नाही. आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामाबाबत उपयोगकर्ते आणि लोक अनभिज्ञ आहेत. डीजीसीएने म्हटले आहे की, ई-सिगारेट सुरक्षेच्या दृष्टीने आणि आरोग्यासाठी घातक आहे. त्याचा उपयोग होऊ नये तसेच विमानात योग्यरीत्या ठेवण्यासाठी कंपन्यांनी धोरण आणि प्रकिया निश्चित करावी. विमान कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट धोरणाची माहिती वेबसाईटद्वारे अथवा तिकिट खरेदी करताना प्रवाशांना द्यावी. नियमावली देशातील सर्व घरगुती विमान कंपन्यांना तसेच शासकीय विमान व सर्वसामान्य विमानांसाठी लागू राहील. ई-सिगारेट व्यतिरिक्त व्हेपोरायझर्स, वेप पेन्स, ई-हुक्का अथवा वेपिंग उपकरणांवर यापुढे बंदी राहील. (वृत्तसंस्था)