गोंधळी खासदारावर बंदी; विमान कंपन्यांचा निर्णय
By Admin | Published: June 17, 2017 12:21 AM2017-06-17T00:21:57+5:302017-06-17T00:21:57+5:30
विमानतळावर उशिरा आल्याने विमानात प्रवेश नाकारलेल्या तेलगू देसम पक्षाचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी विमानतळावर घातलेला गोंधळ आणि इंडिगोच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विमानतळावर उशिरा आल्याने विमानात प्रवेश नाकारलेल्या तेलगू देसम पक्षाचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी विमानतळावर घातलेला गोंधळ आणि इंडिगोच्या अधिकाऱ्याला केलेली धक्काबुक्की यांमुळे आता देशातील जवळपास सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घातली आहे. खासदाराने गुरुवारी विमानतळावर गोंधळ घातला होता. विशाखापट्टणम विमानतळावर केलेल्या गोंधळामुळे रेड्डी यांच्याविरोधात देशातील विमान कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.
त्यांनी गोंधळ घालूनसुद्धा विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांच्या सूचनेवरून इंडिगोने रेड्डी यांना हैदराबादच्या विमानात प्रवेश दिला. अशोक गजपती राजू हे त्यावेळी विशाखापट्टणम विमानतळावरच होते. तेही तेलगू देसमचे आहेत. या घटनेमुळे सर्वच विमान कंपन्यांना कडक पाऊल उचलल्यानंतर मात्र विमान वाहतूकमंत्र्यांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल.
फर्निचर, प्रिंटर तोडले, अधिकाऱ्यालाही मारहाण
खा दिवाकर रेड्डी यांना गुरुवारी विमानाने विशाखापट्टणमहून हैदराबादला जायचे होते. त्यांनी इंडिगोचे तिकीट काढले होते. ते उशिरा विमानतळावर पोहोचले. त्यावेळी विमानासाठीचे चेक इन बंद झाले होतं.
विमानाच्या टेक-आॅफला काहीच वेळ शिल्लक असताना रेड्डी आले. अशा स्थितीत त्यांना बोर्डिंग पास देणे शक्य नाही, असे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. हे ऐकून ते संतापले आणि त्यांनी विमानतळावरील इंडिगोच्या कार्यालयात गोंधळ घातला.
फर्निचर व प्रिंटरची तोडफोड केली. एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. त्यामुळे आपण असे केले नाही, असे खा. रेड्डी म्हणूच शकणार नाहीत.