जवानांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी - गृहमंत्रालयाचे निर्बंध
By Admin | Published: January 14, 2017 08:20 AM2017-01-14T08:20:44+5:302017-01-14T12:13:44+5:30
बीएसएफ, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिका-यांच्या छळाला वाचा फोडल्याने गृह मंत्रालयाने सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध लादले आहेत.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - बीएसएफ, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिका-यांच्या छळाला वाचा फोडल्याने, देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना मिळणा-या वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून टीकाही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे जवांनाच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ' पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरता येणार नाही' असे आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सावध पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे यापुढे पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर संमतीशिवाय करता येईल. तसेच कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओही त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. जवानांना सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकायची असेल तर त्यापूर्वी त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे, आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जवानांकडे स्मार्टफोन आले असून बरेच जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ही सवय कमी करण्यासाठी कडक शिस्तीचं पालन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.
लष्करात स्मार्टफोन वापराला बंदी नाही - लष्करप्रमुख
दरम्यान या सर्व प्रकरणावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्टीकरण दिले असून लष्करात स्मार्टफोनवर बंदी नसल्याचेही स्पष्ट केले.