कार्टून चॅनेलवर जंक फूड, कोका-कोलाच्या जाहिरातींवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 12:52 PM2018-02-08T12:52:15+5:302018-02-08T14:18:49+5:30
कार्टून चॅनलवरील जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी
नवी दिल्ली - लहान मुलांच्या आरोग्यावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नयेत, या दृष्टीकोनातून केंद्र सरकारनं कार्टून चॅनेलवर काही खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी वाढणा-या समस्यांच्या पार्श्वभूमीवर कार्टून चॅनलवर येणा-या जंक फूड आणि कोका-कोलाच्या जाहिरातींवर सरकारनं बंदी आणली आहे.
लहान मुलांमधील वाढणा-या आरोगाच्या समस्या घटवण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण कमी करण्याच्या दिशेनं सरकारनं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कंपन्यांच्या जाहिरातींवर अन्य चॅनेलवरही बंदी घालण्यासंदर्भात सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. कार्टून चॅनेलवर जंक फूड किंवा कोक सारख्या पेय-पदार्थांच्या जाहिराती प्रसारित करू नये, असे निर्देश माहिती-प्रसारण मंत्रालयानं कोका कोला, नेस्लेसहीत अन्य 9 कंपन्यांना दिले आहेत.
''जंक फूडच्या जाहिराती पाहून लहान मुलांना जंक फूड खाण्याची वाईट सवय लागते. तसंच टीव्ही पाहत-पाहत लहान मुलं अशा पदार्थाचं सेवनही करतात. या सवयीमुळे शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या निर्णयाद्वारे लहान मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल'', अशी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली आहे. ते राज्यसभेत बोलत होते.
प्रेक्षकांची दिशाभूल करणा-या जाहिरातींसंबधी भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीनं आपला अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला आहे. यावर केंद्र सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे.