मोकळ्या जागी कचरा जाळण्यास बंदी
By admin | Published: December 24, 2016 01:35 AM2016-12-24T01:35:34+5:302016-12-24T01:35:34+5:30
सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यावर बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने आता देशभरात रस्त्यावर आणि मोकळ्या जागी
नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यावर बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने आता देशभरात रस्त्यावर आणि मोकळ्या जागी कचरा जाळण्यावर निर्बंध आणले आहेत. यासंबंधीचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल. लवादाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेश दिला. अलमित्रा पटेल यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला.
सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर व सक्तीने पालन करण्याचा निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयचाही मदत मागण्यात आली आहे. लवादाने पर्यावरण मंत्रालय व राज्य सरकारांना पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लॅस्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचाही आदेश दिला आहे. या प्लॅस्टिकचा वापर पीव्हीसी पाइप आणि प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी उपयोग होतो. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना चार आठवड्यांत कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात राज्यातील घनकचरा निर्मूलनासाठीचा आराखडा द्यावा लागेल, असे लवादाने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)