उसापासून निर्मित इथेनॉलवर बंदी; साखर उत्पादन घटण्याच्या शक्यतेने निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:43 AM2023-12-08T08:43:55+5:302023-12-08T08:44:28+5:30
ऊसाच्या रसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे कठीण होणार आहे.
नवी दिल्ली : साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे ऊसापासून इथेनॉल निर्मितीला सन २०२३-२४ च्या हंगामात खीळ बसली आहे. त्यामुळे या हंगामात ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने आज सर्व साखर कारखाने आणि डिस्टिलरींना दिले.
ऊसाच्या रसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे कठीण होणार आहे. इथेनॉलच्या निर्मितीमुळे मागील वर्षी साखर उत्पादन ४१ लाख टनांनी घटले, पण आता २१ लाख टनांची भर पडून साखर उत्पादन २९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.
आदेशात काय म्हटले आहे?
साखर नियंत्रण आदेशातील खंड ४ आणि ६ अन्वये इथेनॉल निर्मिती न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उसाचा रस आणि बी-हेवी मोलासेसपासून तयार केलेले इथेनॉल तेल विपणन कंपन्यांनी खरेदी करू नये, असेही म्हटले. सी-हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला आणि मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे.