पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी, बाबा रामदेव यांना मोठा धक्का! कोणती आहेत ती पाच औषधं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 06:47 AM2022-11-12T06:47:19+5:302022-11-12T06:47:36+5:30
डेहराडून : योग विद्येचे गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व ...
डेहराडून :
योग विद्येचे गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत.
दिव्य फार्मसीमार्फत बनविल्या जाणाऱ्या या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत असा दावा करून या प्राधिकरणाने म्हटले आहे की, या औषधांच्या उत्पादनासाठी दिव्या फार्मसीने पुन्हा परवानगी घेणे आवश्यक आहे.
बीपीग्रीट, मधुग्रीट, थायरोग्रीट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रीट गोल्ड टॅबलेट या पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. रक्तदाब, मधुमेह, ग्लुकोमा, हाय कोलेस्टरॉल यावर ही औषधे असल्याचा दावा करण्यात येत होता. या औषधांविरोधात केरळमधील डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी तक्रार केली होती. याबाबत आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही असे पतंजली ग्रुपचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.