नरेंद्र मोदींवरील वेब सीरिजवरही बंदी; निवडणूक आयोगाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:17 AM2019-04-21T04:17:25+5:302019-04-21T06:51:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजवरही बंदी घालण्याचे आदेश दिले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजवरही बंदी घालण्याचे आदेश शनिवारी दिले. ही वेब सीरिज तयार करणाऱ्या इरॉस नाऊ या कंपनीला निवडणूक आयोगाने तसे कळवले आहे.
‘मोदी : जर्नी आफ अ कॉमन मॅन’ असे या वेब सीरिजचे नाव असून, ती पाच भागांची आहे. ती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित करू नका, असे निवडणूक आयोगाने इरॉस नाऊ या कंपनीला बजावले आहे. सर्व वेब सीरिज आॅनलाइनच दाखविल्या जातात. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे या वेब सीरिज दाखविता येणार नाही. ही पाच भागांची मालिका, तसेच मालिकेशी संबंधित कोणताही भाग दाखवायलाही निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.
आमच्या पुढील आदेशांपर्यंत ही मालिका दाखविण्यात येऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच निवडणुका होईपर्यंत ती दाखविता येणार नाही, असे दिसते. इरॉस नाऊ ही मुंंबईतील कंपनी असल्याने महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाºयामार्फत तिला हा आदेश बजावण्यात आला आहे.
नमो टीव्ही सुरूच
मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनावर आयोगाने घातलेली बंदी आयोगाने उठवलेली नाही. या बंदीविरोधात चित्रपटाचे निर्माते न्यायालयात गेले आहेत. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तो चित्रपट पाहून आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. त्या अहवालाच्या आधारे बंदीबाबतचा निर्णय न्यायालय घेणार आहे. याखेरीज नमो टीव्हीवरही आयोगाने बंदी घातली. पण आम्ही नमो टीव्ही
टेलिकास्ट नव्हे, तर वेबकास्ट करतो, अशी पळवाट काढून भाजपने नमो टीव्हीवरून पंतप्रधान मोदी यांची भाषणे व प्रचार सुरूच ठेवला आहे.