मतमोजणीनंतर विजयी मिरवणुकांवर बंदी; कोर्टाच्या फटकाऱ्यानंतर आयोगाला जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:09 AM2021-04-28T06:09:41+5:302021-04-28T06:10:10+5:30
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी येथे विधानसभेसाठी मतदान पार पडले.
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असताना विधानसभा निवडणुकीसाठी जंगी प्रचार सभा, रॅलींचे आयोजन झाले होते. त्यावर मद्रास न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली आहे. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूका काढण्यास आयोगाने बंदी घातली आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी येथे विधानसभेसाठी मतदान पार पडले. पश्चिम बंगालमध्ये अखेरचा टप्पा अद्याप शिल्लक आहे. मात्र, राजकीय पक्षांनी काढलेल्या जंगी प्रचार सभा, रॅली आणि त्यानिमित्ताने झालेल्या गर्दीमुळे मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगला सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान धारेवर धरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार असून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने फटकारले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी कोविड नियमावली जाहीर केली आहे.
२ मे रोजी निकाल, असे असतील नियम
निकालाचा दिवस आणि त्यानंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. तसेच विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोनपेक्षा अधिक जणांना सोबत नेता येणार नाही. मतमोजणी कक्षामध्ये गर्दी व्हायला नको. या ठिकाणी ५० टक्के लोकांचीच उपस्थिती राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. पाचही विधानसभांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.