कोलकात्यात कालिमाता पूजेस महिलांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:58 AM2018-11-06T05:58:59+5:302018-11-06T05:59:43+5:30
पश्चिम बंगालमधील एका कालिमाता पूजेच्या एका मंडपामध्ये महिलांना गेल्या ३४ वर्षांपासून प्रवेश नाकारला जात आहे. या प्रथेचा समाजातील सुजाण लोकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालमधील एका कालिमाता पूजेच्या एका मंडपामध्ये महिलांना गेल्या ३४ वर्षांपासून प्रवेश नाकारला जात आहे. या प्रथेचा समाजातील सुजाण लोकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्या, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही त्याची कारवाई संतप्त भक्तांच्या निदर्शनांमुळे होऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर कोलकातातील या वादाकडेही पाहिले जात आहे. चेतला प्रदीप संघातर्फे बसविण्यात येणाऱ्या कालिमातेच्या मूर्तीची बीरभूम जिल्ह्यातील पुजाºयांकडून गेल्या ३४ वर्षांपासून पूजाअर्चा केली जाते. या संघाचे सहसचिव सैबल गुहा यांनी सांगितले की, आमच्या मंडपात देवीदर्शनासाठी महिलांना येऊ दिले तर वस्तीमध्ये काही ना काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही महिलांना परवानगी देत नाही. चेतला प्रदीप संघाचे पुरुष सदस्यच कालिमातेच्या पूजेसाठी लागणारा प्रसाद व नैवेद्य बनवितात. उत्सवाची इतर कामेही तेच करतात. मूर्तीचे पावित्र्य कायम राखावे यासाठी विलक्षण काळजी घेतली जाते. इतिहासकार नृसिंहप्रसाद भादुरी यांनी सांगितले की, कालिमातेच्या दर्शनासाठी महिलांना मंडपात प्रवेश देऊ नका, असे धर्मशास्त्रात कुठेही सांगितलेले नाही. (वृत्तसंस्था)
परंपरा योग्य असल्याची श्रद्धा
चेतला प्रदीप संघाच्या कालिमाता पूजा मंडपात महिलांना प्रवेश नाकारत असल्याबद्दल तेथील एक महिला भक्त सविता दास हिने कोणताही आक्षेप घेतला नाही. तिने सांगितले की, मी या परिसरात वीस वर्षांपूर्वी राहायला आले. येथील परंपरांवर आमची श्रद्धा असून त्या तोडणे योग्य होणार नाही.