बीएचयूमधील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने एसएचओ, सीओ आणि एसीएम निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:08 AM2017-09-25T09:08:43+5:302017-09-25T12:27:37+5:30
विद्यापीठात सुरू असलेला हा हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने स्टेशन ऑफिसर (एसओ), सीओ आणि अतिरिक्त शहर दंडाधिकारी या तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे.
वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या लाठीमारामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून तब्बल १,२०० विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.
विद्यार्थिनींवरील लाठीमार प्रकरणी स्टेशन हाऊस ऑफिसर आणि सर्कल ऑफिसर यांना निलंबित करण्यात आलं आहेत. याशिवाय विद्यापीठ परिसरातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने अतिरिक्त शहर दंडाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराला बाहेरील व्यक्ती जबाबदार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण लागलं. विद्यापीठाचे कुलगुरु जी. सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींवर रात्री 10 वाजता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. विद्यापीठात सुरू असलेला हा हिंसाचार रोखता आला नाही म्हणूनच तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
#BHU protests: Station Officer (SO) Lanka,CO Bhelupur and one Additional City Magistrate (ACM) removed prima facie for lathicharge #Varanasipic.twitter.com/YnxhMJGwMY
— ANI UP (@ANINewsUP) September 25, 2017
शहरातील कॉलेज आजपासून बंद
बीएचयूमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन लक्षात घेऊन बीएचयूला आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएचयू आता नवरात्रौत्सवानंतर सुरू होणार आहे. 6 ऑक्टोबरपासून कॉलेज पुन्हा सुरू होणार असल्याचं समजतं आहे. बीएचयूच्या प्राचार्य डॉ. पूनम सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. तसंच शहरातील डॉक्टर संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय आणि महात्मा गांधी काशी विद्यापाठी तसंच शहरातील इतर कॉलेज आजपासून बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश्वर राम मिश्रा यांनी दिले आहेत.
सोशल मीडियावर #अबकी_बार_बेटी_पर_वार हा हॅशटॅग ट्रेंडिंग
बीएचयूमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं वृत्त आल्यापासून सोशल मीडियावर #अबकी_बार_बेटी_पर_वार हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. विद्यापीठात सुरक्षेची हमी मागणा-या विद्यार्थिनींवर करण्यात आलेला लाठीचार्ज म्हणजे 'बेटी पर वार' असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी पंतप्रधानांचा वाराणसी दौरा आणि रविवारच्या मन की बात कार्यक्रमासोबत या घटनेला जोडलं असून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. जर मुलींच्या जागी गाय असती तर असा हल्ला झाला नसता अशे अनेक खोचक ट्वीट यावेळी करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण
फाइन आर्ट्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीची बाइकवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्याबाबत तिनं सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली असता, त्यांनी तिलाच उपदेशाचे डोस पाजले होते. अंधार झाल्यावर तू बाहेर काय करत होतीस, असं त्यांनी तिला विचारलं. हा सगळा प्रकार तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितला होता, तेव्हा सगळ्यांनी मिळून धरणं आंदोलन करायचं ठरवलं होतं. आयआयटी-बीएचयू आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. कुलगुरूंनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. परंतु, तेवढ्याने विद्यार्थिनींचं समाधान झालं नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्यानंतरही आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होतं. पण, कुलगरू जी सी त्रिपाठी यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थिनींवर सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती चिघळली.