भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणींवर यमुना कोपली; चौघांचे मृतदेह सापडले; ८ जण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:39 AM2022-08-12T07:39:12+5:302022-08-12T07:39:43+5:30
ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती.
बांदा (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना नदीच्या मधोमधच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट बुडाली. यामुळे बोटीतील ३५ जण बुडाले असून, यात चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अनेकजण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मरका भागात गुरुवारी ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांना दिली.
ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती. नावेत ३० ते ३५ लोक होते, असे पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांची मदत घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. सात ते आठ लोक पोहून किनाऱ्यावर पोहोचले. तथापि, अनेकजण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले.
असा घडला प्रसंग...
ज्यावेळी बोट नदीच्या मधोमध पोहोचली त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे हलू लागली. बोटीतील लोक घाबरून इकडे तिकडे जाऊ लागले. बोटीत एकाच बाजूला लोकांची संख्या वाढल्याने अचानक बोट उलटली. काही लोक पोहायला लागले. मात्र, महिला आणि मुले बुडू लागली. नदीच्या मध्यभागी बोट बुडाल्याने ते वाहून जात होते. यावेळी २ बोटी मदतीला आल्या. त्यांनी काही लोकांना वाचवले. मात्र, या घटनेत अनेक महिला आणि मुले वाहून गेली.
प्रशासनाला मदतीचे आदेश
चार मृतदेह हाती लागले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दुर्घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्याची देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत.
बोट २० जणांची, बसले ३५
बेपत्ता लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेत अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. या बोटीची बसण्याची क्षमता २० होती. मात्र, या बोटीत ३५ जणांसह मोटारसायकलही भरल्या होत्या. त्यामुळे बोट बुडाली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
आम्ही आमच्या गावातून पत्नीला घेऊन तिच्या आई्-वडिलांच्या घरी राखी बांधायला निघालो होतो. आम्ही नदीच्या काठावर पोहोचलो तेव्हा एकच बोट होती. त्यामुळे एकाच वेळी ३५ जण बोटीत चढले. यावेळी बोटीवर काही मोटारसायकलही ठेवल्या होत्या.
- दुर्घटनेतून बचावलेला प्रत्यक्षदर्शी