National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:49 AM2024-06-14T10:49:01+5:302024-06-14T11:34:20+5:30
शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा येथील बँकेत ग्रामस्थ, शेतकरी आणि मजुरांनी गोंधळ घातला. त्यांच्या खात्यातील मजुरीचे पैसे, कर्जाचे पैसे, किसान सन्मान निधी आणि पेन्शनचे पैसे अचानक गायब झाल्याचं त्यांनी सांगितलं. बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक करून पैसे काढले आहेत. याठिकाणी सुमारे ३०० ते ४०० पोहोचले होते, त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.
जसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडरिया गाव ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यांचे पैसे फसवणूक करून इतर लोकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
बँक व्यवस्थापक व बांदा येथील अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली, मात्र कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. यानंतर त्यांनी बँकेबाहेर निदर्शने करत पैशांची मागणी केली. सुनावणी झाली नाही, तेव्हा जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निषाद यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली, त्यावर मंत्र्यांनी तातडीने डीएम, एसपी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक रामराज मीना यांनी ग्रामस्थांनी केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचं सांगितलं. ज्या लोकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्या सर्वांना बँक स्टेटमेंट काढून देण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निषाद म्हणाले की, आज गडरिया गावातील रहिवासी आणि शेतकरी आले होते. गावातील बँकेत खातं उघडून त्यांनी कष्टाचे पैसे जमा केले होते. त्यांच्या खात्यातून फसवणूक करून पैसे काढण्यात आले असून त्यांचे ट्रान्जेक्शन इतर खात्यांमध्ये झाल्याची या सर्वांची तक्रार आहे.
या प्रकरणी डीएम, एसपी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. चौकशीनंतर मला कळवा आणि कारवाई करा, असं मी म्हटलं आहे. ३०० ते ४०० लोकांचा तपशील देण्यात आला आहे, जे बँकेचं पासबुक घेऊन आले होते असं रामकेश निषाद यांनी म्हटलं आहे.