वांद्रे देशातील सातवे स्वच्छ रेल्वे स्टेशन , जोधपूर, जयपूर, तिरुपती पहिल्या तीन स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:21 AM2018-08-14T04:21:53+5:302018-08-14T04:21:57+5:30
रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूर या यादीत ३२व्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर जोधपूर, जयपूर आणि तिरुपती रेल्वे स्टेशन आहेत. देशाच्या ए श्रेणी स्थानकात महाराष्ट्रातील एकाही रेल्वे स्टेशनाचा समावेश नाही. या यादीत पहिल्या दोन स्थानांवर राजस्थानचे मारवाड आणि फुलेरा यांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर दक्षिणेतील वारांगल रेल्वे स्टेशनचा क्रमांक आहे. ए १ श्रेणी आणि ए श्रेणीत राजस्थानचे सर्वाधिक स्टेशन्स आहेत.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, ज्या रेल्वे स्टेशनमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आल्या त्या ए १ श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये मुंबईतील सीएसएमटी आणि दादर यांचा समावेश आहे. तर या यादीत सर्वाधिक सुधारणा भोपाळ रेल्वे स्थानकाने केली आहे.
रेल्वेमंत्र्यांकडून जारी अहवालानुसार, ए १ श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील मुंबई सीएसएमटी १३व्या क्रमांकावर आहे. तर, पुण्याला यात २५वा क्रमांक मिळाला आहे. नागपूर ३२व्या तर, लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशन ३५व्या स्थानावर आहे. मुंबई सेंट्रल ४०व्या, सोलापूर ४८, ठाणे ५७, कल्याण ७४व्या क्रमांकावर आहे.
ए श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये बडनेरा २६, अकोला २७, नाशिक रोड ४१, वास्को दी गामा ५७, नडियाद ७५, अमरावती ७८, वर्धा ८३, कोल्हापूर ११७, मनमाड १४३, अहमदनगर १५८, कुरुंदवाडी १६८, जळगाव १८४, लातूर २१२, शिर्डी २२०, चंद्रपूर २२२, पनवेल २४३, लोणावळा २६३, कोपरगाव २८व्या स्थानी आहे.