बंगळुरूमध्ये स्फोट; एक ठार

By admin | Published: December 29, 2014 06:03 AM2014-12-29T06:03:57+5:302014-12-29T06:03:57+5:30

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेस्टॉरंटसमोर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या स्फोटात एक महिला ठार

Bangalore blasts; One killed | बंगळुरूमध्ये स्फोट; एक ठार

बंगळुरूमध्ये स्फोट; एक ठार

Next

बंगळुरू : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेस्टॉरंटसमोर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या स्फोटात एक महिला ठार, तर तीन जण जखमी झाले. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. सिमीच्या फरार कार्यकर्त्यांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.
चर्च स्ट्रीटनजीक आणि ब्रिगेड रोडजवळ असलेल्या कोकोनट ग्रोव्ह या लोकप्रिय रेस्टॉरंटवर सुटीच्या दिवसामुळे खूप गर्दी होती. स्फोटामुळे उडालेल्या तुकड्यांमुळे भवानी नावाची महिला ठार व तीन जण जखमी झाले, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी घटनास्थळी वार्ताहरांना दिली. स्फोट इम्प्रोव्हाईजड् एक्स्प्लोजिव्ह डिव्हाईसने (आयएईडी) घडवून आणण्यात आल्याचे ते म्हणाले.
संपूर्ण शहरातील पोलीस दल सक्रिय करण्यात आले असून, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाची मदतही मागविण्यात आल्याचे रेड्डी म्हणाले.
अंतर्गत सुरक्षा विभागाचे तज्ज्ञ, फोरेन्सिक तुकडी, श्वानपथक व घातपातविरोधी तपासणी पथक घटनास्थळी पाठविण्यात आले होते.
स्फोटाची जबाबदारी अजून कोणी घेतलेली नाही. शहराला कोणत्याही धोक्याची शक्यता वाटते का, असे विचारता रेड्डी म्हणाले, ‘काही सण आणि जवळ आलेली वर्षअखेर पाहता काही भीती ही गृहीतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगली जातेच.’ यापूर्वी बंगळुरूत २००८,२०१० आणि २०१३ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते.
२००८ मध्ये ९ ठिकाणी बॉम्बस्फोट आयईडीने घडविले गेले होते. त्यात २ जण ठार २० जण जखमी झाले होते. २०१० मध्ये क्रिकेट स्टेडियमबाहेर आयपीएल सामना सुरू व्हायच्या काही तास आधी दोन बॉम्बस्फोट होऊन त्यात १५ जण जखमी झाले होते. तिसरा बॉम्ब निकामी करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्लीत सतर्कता

बंगळुरूतील स्फोटानंतर मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्लीत सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या जल्लोषावरही या स्फोटाचे सावट राहणार आहे.


केंद्राकडून सर्व मदत

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून केंद्राकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमधील स्थितीची माहिती त्यांना दिली, अशा कोणत्याही घटनेला तोंड द्यायला केंद्र सरकार तयार असल्याचे राजनाथ सिंह यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.

इसिसचा संबंध?
इसिसचा टिष्ट्वटर मेहदी मसरूर बिश्वास याला जेरबंद करण्यात आल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बंगळुरु पोलिसांना दिला होता. मेहदीच्या अटकेनंतर इसिसच्या पाठीराख्यांनी बंगळुरुचे सह-आयुक्त (गुन्हे) हेमंत निंबाळकर आणि उपायुक्त अभिषेक गोयल यांनाच थेट हा संदेश पाठवला होता.

Web Title: Bangalore blasts; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.