भारतातील पहिली 'हेलिटॅक्सी' येणार बंगळुरुमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 01:52 PM2017-08-05T13:52:51+5:302017-08-05T14:27:35+5:30

बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रवाशांना 15 मिनिटांमध्ये विमानतळावर जाण्यासाठी व तेथून येणे शक्य होणार आहे.

Bangalore To Have India’s First Helicopter Taxi Service | भारतातील पहिली 'हेलिटॅक्सी' येणार बंगळुरुमध्ये

भारतातील पहिली 'हेलिटॅक्सी' येणार बंगळुरुमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देइलेक्ट्रॉनिक सिटीमधील प्रवाशांचा विमानतळावर जाण्याचा वेळ वाचणार.दोन तासांएेवजी 15 मिनिटांमध्ये विमानतळावर जाता येणे शक्य बंगळुरु विमानतळावर सध्या दररोज 60 हजार प्रवाशी प्रवास करतातथुम्बे एव्हिएशन कंपनी ही हेलीटॅक्सी चालवणार आहे.

बंगळुरू, दि.5- विमानतळ म्हटलं की शहराबाहेरच्या लांब जागेवर जाणं आलं. सगळं शहर पार करून ट्रॅफिकला तोंड देत जायचं म्हटलं की प्रवाशांचा जीव नकोसा होतो. देशांतर्गत विमान प्रवास करायचा झाला की बहुतांश वेळेस तासा-दोनतासाचा विमानप्रवास असतो पण विमानतळावर जाण्यासाठी आणि उतरल्यावर पुन्हा शहरात जाण्यासाठी तीन-चार तास ट्रॅफिकमध्ये घालवावे लागतात. आता मात्र प्रवाशांची ही कोंडी फुटणार आहे. बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रवाशांना 15 मिनिटांमध्ये विमानतळावर जाण्यासाठी व तेथून येणे शक्य होणार आहे.

सध्या बंगळुरुमधील इलेक्ट्रॉनिक सिटीमधील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. बंगळुरुमधील एचएएल विमानतळ, व्हाईटफिल्ड एअरपोर्ट येथे हे हेलिकॉप्टर उतरू शकेल त्याचप्रमाणे ज्या इमारतींवर हेलिपॅड आहे अशा 90 इमारतींवर हे हेलिकॉप्टर उतरू शकेल असे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी आणि विमानतळ यांच्यामधील अंतर 55 किमी असून. प्रवाशांना ते अंतर पार करण्यासाठी दोन तास प्रवास करावा लागतो. तसेच नेहमीच्या टॅक्सीला या प्रवासासाठी 2500 रुपये मोजावे लागतात. आता हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु झाल्यास हा वेळ 15 मिनिटांवर येणार आहे. बंगळुरु विमानतळावरुन दररोज 60 हजार प्रवासी प्रवास करतात, त्यातील 100 लोकांनी जरी ही सेवा वापरली तर ती आर्थिकदृष्ट्या परवडेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ही सेवा थुम्बे एव्हिएशन कंपनीतर्फे सुरु होत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकावेळेस सहा प्रवासी प्रवास करु शकतील. बंगळुरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अधिकारी आणि कर्नाटक सरकारचे उद्योगमंत्री वाणिज्यमंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्यामते या सेवेला वातानुकुलित टॅक्सीइतका खर्च येईल असा अंदाज आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी बंगळुरुप्रमाणे इतर शहरांमध्येही अशीच हेलिटॅक्सी सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

बंगळुरुची लोकसंख्या सुमारे 1 कोटी इतकी असून या शहरामध्ये 69 लाख वाहने आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक तीन व्यक्तींच्या मागे दोन दुचाकी आहेत. त्यामुळे या शहरामध्ये सतत वाहतूक कोंडी असते. मेट्रोचे जाळे अद्याप पुरेसे पसरलेले नसल्यामुळे आजही बंगळुरुच्या नागरिकांना रस्तेवाहतुकीवरच भर द्यावा लागतो.

Web Title: Bangalore To Have India’s First Helicopter Taxi Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.