बंगळुरू - नांदेड एक्स्प्रेसला आंध्रात अपघात
By admin | Published: August 25, 2015 03:34 AM2015-08-25T03:34:12+5:302015-08-25T03:34:12+5:30
आंध्र प्रदेशच्या कर्नाटक सीमेलगतच्या अनंतपूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे ग्रॅनाईटने भरलेल्या एका भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोडत बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली.
ट्रकने दिली धडक : काँग्रेस आमदारासह सहा ठार; दोन जखमी
अनंतपूर : आंध्र प्रदेशच्या कर्नाटक सीमेलगतच्या अनंतपूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे ग्रॅनाईटने भरलेल्या एका भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोडत बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कर्नाटकातील काँग्रेस आमदार व्यंकटेश नाईक यांच्यासह सहा ठार तर दोघे जखमी झाले. नाईक हे रायचूर जिल्ह्याच्या देवदुर्ग मतदारसंघाचे आमदार होते. रेल्वे मंत्रालयाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, दक्षिण परिमंडळाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मदाकासिरा येथे हा अपघात घडला. सर्व सुरक्षा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगातील ट्रक रेल्वे फाटक
तोडत नांदेडकडे निघालेल्या एक्स्प्रेसच्या एच-१ डब्यावर जाऊन धडकला. यामुळे तीन स्लीपर कोच रुळावरून घसरले. तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकवाहक आणि रेल्वेचे दोन कर्मचारीही दगावले.
सोनियांनी व्यक्त
केले दु:ख
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली.