बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला आंध्रमध्ये अपघात, आमदारासह ६ ठार
By admin | Published: August 24, 2015 08:40 AM2015-08-24T08:40:45+5:302015-08-24T12:18:54+5:30
आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात बंगळूरू-नांदेड एक्स्प्रेसला ट्रकची धडक बसून कर्नाटकच्या आमदारासह ६ जण ठार तर २० प्रवासी जखमी झाले
ऑनलाइन लोकमत
अनंतपूर, दि. २४ - बंगळूर-नांदेड एक्स्प्रेसला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकच्या आमदारासह ६ जण ठार तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे हा दुर्दैवी अपघात घडला.
अनंतपूर जिल्ह्यातील मदकिसरा येथे रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेल्या बंगळुरू- नांदेड एक्स्प्रेसला ग्रॅनाईड घेऊन जाणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रक चालकाच ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला व एक्स्प्रेसच्या एच-१ या डब्याला जोरात धडक बसून त्या बोगीसह आणखी दोन बोगीही रुळावरून खाली घसरल्या. या अपघातात कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार व्यंकटेश नायक यांच्यासह ५ जम ठार झआले असून त्यात ट्रक चालकाचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी व बचाव पथकाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेेतली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
पहाटे घडलेल्या या भीषण अपघातामुळे बंगळुरू- गुंटाकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याते प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.