बंगळुरूला जाणवणार 'नेलमॅन'ची पोकळी, वाचा कोण आहे हा 'नेलमॅन'
By admin | Published: February 8, 2017 07:49 PM2017-02-08T19:49:22+5:302017-02-08T20:05:17+5:30
बंगळुरूतील पंक्चर दुकानदार लवकरच सुटकेचा निःश्वास सोडतील, कारणंही तसंच आहे. बेनेडिक्ट जेबाकुमार हा व्यक्ती लवकरच बंगळुरू सोडणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 8 - बंगळुरूतील पंक्चर दुकानदार लवकरच सुटकेचा निःश्वास सोडतील, कारणंही तसंच आहे. बेनेडिक्ट जेबाकुमार हा व्यक्ती लवकरच बंगळुरू सोडणार आहे. प्रश्न पडला असेल कोण आहे हा जेबाकुमार. जेबाकुमार यांना बंगळुरूच्या पंक्चर दुकानदारांचा कर्दनकाळ म्हटलं तर वावगं ठरू नये.
लोकांच्या गाड्या पंक्चर व्हाव्यात म्हणून येथील पंक्चरवाले रस्त्यावर खिळे टाकायचे. धंदा जास्त व्हावा हा त्यामागचा उद्देश. इंजिनीअर असलेले जेबाकुमार एक दिवस बानाशंकरी या त्यांच्या राहत्या घरून बेल्लांदूर येथे ऑफिसला जायला निघाले. वाटेत त्यांची गाडी पंक्चर झाली. रस्त्यात असलेल्या खिळ्यांमुळे गाडी पंक्चर झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण हे खिळे चुकून नाही तर जाणूनबुजून ठेवल्याचंही त्यांनी हेरलं. जाणूनबुजून रस्त्यावर खिळे टाकले जात असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी त्या रस्त्याने जाणं टाळलं. मात्र, नंतर याविरोधात लढण्याचं त्यांनी ठरवलं. पण लढणंही कसं? तर काहीसा गांधीगिरीचा मार्ग त्यांनी अवलंबला. म्हणजे तुम्ही खिळे टाकत राहा मी ते उचलत राहील असाच.
रोज सकाळी ऑफिसला ते आपल्या सायकलवर निघायचे. सोबत एक काठी आणि काठीच्या टोकाला लोहचुंबक लावलेलं असायचं. त्या सहाय्याने वाटेत पडलेले खिळे उचलायला त्यांनी सुरुवात केली. गेल्या 5 वर्षांपासून ते हे काम करत आहेत.
दोन वर्षांपूर्वी एका मित्राने खिळ्यांचा संग्रह करण्याचा आणि फेसबुकवर पेज बनवण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यानुसार त्यांनी खिळे जमवायला सुरुवात केली आणि फेसबुकवर 'माझा रस्ता, माझी जबाबदारी' (My road, my responsibility) असं एक पेज बनवलं. केवळ दोन वर्षांतच त्यांनी तब्बल 75 किलो खिळ्यांचा संग्रह केला आहे.
जेबाकुमार हे आता लवकरच बंगळुरू सोडणार आहेत. कारण त्यांच्या आवडीचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यासाठी चांगल्या पगाराची इंजिनीअरची नोकरी आणि कर्नाटक सोडून मूळ गाव असलेल्या तामिळनाडूमध्ये ते जाणार आहेत. तेथे जाऊन मत्स्य व्यवसाय ते करणार आहेत. मच्छीमारीचा व्यवसाय करणं ही त्यांची पहिली आवड होती.
बंगळुरू सोडणार असल्याने येत्या शुक्रवारी त्यांनी संग्रहित केलेल्या खिळ्यांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळेच आता बंगळुरूमधील गाडीचालकांना जेबाकुमार या नेलमॅनची उणीव जाणवेल आणि तितकाच आनंद पंक्चर दुकानदारांनाही झाला असेल हे नक्की.