बांगलादेशात हिंदूंची 15 मंदिरं आणि 100 घरांची तोडफोड
By admin | Published: November 1, 2016 10:40 AM2016-11-01T10:40:36+5:302016-11-01T10:50:09+5:30
फेसबुकवर 'इस्लाम'बाबत कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 1 - बांगलादेशमधील हिंदू धर्मियांच्या जवळपास 15 मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकवर 'इस्लाम'बाबत कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या बातमीमुळे ही तोडफोड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे येथील अल्पसंख्याकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, तोडफोड करणा-यांविरोधात प्रशासकीय अधिका-यांनी कायदेशीर कारवाई करत आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राम्हणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगरमध्ये रविवारी मंदिरांची तोडफोड करून हिंदू नागरिकांची 100 पेक्षा जास्त घरं लुटण्यात आली. यामुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर माधबपूरमधील मंदिरांनाही टार्गेट करण्यात आले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही मंदिरांच्या पुजा-यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मंदिरांतील अधिका-यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. 'एका हिंदू तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याने, मंदिरांच्या तोडफोडीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अशांतता पसरवल्याप्रकरणी संबंधित तरुणालाही अटक करण्यात आली आहे',अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.