प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बांगलादेशचे सैनिक होणार सहभागी; १२२ जणांचे पथक दाखल
By देवेश फडके | Published: January 14, 2021 10:31 AM2021-01-14T10:31:01+5:302021-01-14T10:33:15+5:30
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बांगलादेशचे सैनिक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. एखाद्या परदेशी सैन्याच्या तुकडीला आपल्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी करून घेण्याची ही तिसरी वेळ आहे.
नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम वेगळा ठरणार आहे. कोरोना संकटामुळे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. तसेच या सोहळ्याची तयारीही अगदी जोरात सुरू आहे. मात्र, यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बांगलादेशचे सैनिक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष पाहुणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. ०५ जानेवारी रोजी जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून आपण येत नसल्याची माहिती दिली.
भारतीय उच्चायुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश सशस्त्र दलाच्या १२२ सैनिकांची तुकडी भारतीय वायुसेनेच्या सी-१७ या विशेष विमानाने भारतात दाखल झाली आहे. कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे ही तुकडी १९ जानेवारीपर्यंत विलगीकरणात राहणार आहे. एखाद्या परदेशी सैन्याच्या तुकडीला आपल्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी करून घेण्याची ही तिसरी वेळ असून, यापूर्वी फ्रान्स आणि संयुक्त अरब आमिरातीच्या तुकड्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.
बांगलादेश मुक्ती संग्रामाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांची एक तुकडी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणाऱ्या बांग्लादेशच्या तुकडीतील सैनिक हे बांग्लादेश सैन्यातील प्रतिष्ठित विभागातील आहेत. १, २, ३, ४, ८ ९, १० आणि ११ ईस्ट बंगाल रेजिमेंट आणि १, २ आणि ३ फिल्ड आर्टिलरी रेजिमेंटच्या सैनिकांचा सहभाग आहे. या दलाला १९७१ च्या युद्धात सहभागी होणे आणि ते युद्ध जिंकण्याचा सन्मान प्राप्त आहे. या तुकडीमध्ये बांग्लादेशच्या नौदलाचे आणि वायूदलाचे अधिकारीही सहभागी आहेत.